सातारा : जिल्ह्यात प्लास्टिक वापरावर बंदीची अंमलबजावणी करा | पुढारी

सातारा : जिल्ह्यात प्लास्टिक वापरावर बंदीची अंमलबजावणी करा

सातारा; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने एकल वापराच्या प्लास्टिक वस्तू वापरण्यास प्रतिबंधित केले आहेत. त्यानुसार याची अंमलबजावणी जिल्ह्यामध्ये 1 जुलैपासून करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.
एकल वापर प्लास्टिक (एसयूपी) बंदी अंमलबजावणीसाठीची जिल्हास्तरीय कृती दलाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी एल.एस. भड यांच्यासह नगरपालिका व नगर पंचायतीचे मुख्याधिकारी, गट विकास अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, प्लास्टिक कचर्‍याचे विलगीकरण, संकलन, साठवण, वाहतूक, प्रक्रिया आणि विल्हेवाट यासाठी असणारी यंत्रणा अधिक सक्षम करावी. कृती आराखड्यासह शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये, एनसीसी, एनएसएस, स्काऊट्स, युवा क्लब, इको क्लब आणि स्वयंसेवी संस्थांचा समावेश करुन प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी सार्वजनिक चळवळ उभी करावी. एकल वापर प्लास्टिक वस्तूंचा वापर करण्यास परावृत्त करावे. ग्रामीण भागातील आठवडी बाजारांमध्ये प्लास्टिक वापराबाबत बंदी घालण्यात यावी. कचरा व्यवस्थापसंदर्भात ग्रामपंचायतींची कार्यशाळा घ्यावी, असेही जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

Back to top button