उत्तर महाराष्ट्र

नाशिक : बेपत्ता मुलाला मनमाड रेल्वे सुरक्षा दलाने केले पालकांच्या स्वाधीन

गणेश सोनवणे
नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा 
मनमाड रेल्वे जंक्शन स्थानकात भेदरलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलाला त्याच्या पालकांचा शोध घेवून मनमाड रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने सुखरूपपणे पालकांच्या ताब्यात दिले. रेसुबचे प्रभारी अधिकारी बेनीप्रसाद मिना यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सोमवारी सकाळी या अल्पवयीन मुलाचे पालक मनमाड येथे दाखल झाले आणि बेपत्ता असलेल्या आपल्या मुलाला पाहून पालकांचा जीव भांड्यात पडला आणि त्यांनी रेल्वे सुरक्षा बलाला धन्यवाद देत आपल्या मुलाला ते घेवून गेले.
याबाबत अधिक माहिती अशी की, रेल्वे सुरक्षा बलाचे सहाय्यक उपनिरीक्षक गणेश कुमरावत हे फलाट क्रमांक ४ वर रात्री बाराच्या सुमारास गस्त घालत असतांना घाबरलेल्या अवस्थेत एक अल्पवयीन मुलगा त्यांना फिरतांना मिळून आला. त्यांनी त्या मुलाल ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव अदनान खलील खान (वय १४) रा. चंपा चौक, औरंगाबाद असे सांगितले. रेल्वे सुरक्षा बलाने अधिक चौकशी करून त्याच्या वडीलांचा मोबाईल क्रमांक मिळविला व त्यांच्याशी संपर्क साधून मुलगा मनमाड येथे असल्याचे कळवले.
आपल्या मुलाची मानसिक स्थिती ठिक नाही. औरंगाबाद येथे मानसोपचार तज्ञांकडे त्याचे उपचार सुरू आहे. घरात कोणालाही काहीही न सांगता तो निघून आला आहे. अशी माहिती त्याच्या वडीलांनी दिली. रेसुब कर्मचाऱ्यांनी या मुलास अल्पोपहार आणि त्याला मानसिक आधारही दिला. अदनान चे वडील खलील खान आणि शबाना बेगम हे मनमाड रेल्वे स्थानकांत रेसुब कार्यालयात आले आणि आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मुलाला पालकांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT