नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांच्याविरुद्ध भाजपशासित केंद्र सरकार हे सरकारी यंत्रणांचा, विशेषत: ईडीचा गैरवापर करून दबावतंत्राने विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या विरोधात शुक्रवारी (दि.17) काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधातील घोषणाबाजी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. गेल्या अनेक वर्षांपासून सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी हे केंद्र सरकारच्या विरोधामध्ये, त्यांच्या चुकीच्या नीती आणि धोरणांच्या विरोधात आवाज उठवत आहे. त्यामुळेच केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकारकडून ईडी व इतर सरकारी यंत्रणांद्वारे दबाव टाकून गांधी परिवार व काँग्रेसविरोधात सूड उगवला जात आहे. या सर्व प्रकाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
यावेळी आमदार हिरामण खोसकर, जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, माजी नगरसेविका डॉ. हेमलता पाटील, शाहू खैरे, राजाराम पानगव्हाणे, सुरेश मारू, उद्धव पवार, वसंत ठाकूर, उषा साळवे, मीरा साबळे, अरुणा पवार, राजेंद्र बागूल आदी उपस्थित होते.