नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदापात्रातील अडथळे दूर करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, त्याचाच एक भाग म्हणून गोदापात्रात ठिकठिकाणी वाढलेल्या पाणवेली हटविण्याचे काम महापालिका कर्मचार्यांच्या माध्यमातून करण्यात आले.
मनपा आयुक्त रमेश पवार यांच्या आदेशानुसार नाशिकरोड विभागात पंचक घाट आणि परिसरात गोदावरी नदीपात्रातील पाणवेली काढण्यात आल्या. तसेच परिसरातील मोकळ्या जागेची स्वच्छता करण्यात आली. यावेळी उपआयुक्त डॉ. विजय मुंढे, उपआयुक्त डॉ. दिलीप मेनकर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांच्या मार्गदर्शन आणि नियंत्रणाखाली मोहीम घेऊन मोठ्या प्रमाणावर पाणवेली तसेच कचरा, प्लास्टिक संकलित करून स्वच्छता करण्यात आली. विभागीय अधिकारी सुनील आव्हाड, विभागीय स्वच्छता निरीक्षक साळवे आणि स्वच्छता कर्मचार्यांनी मोहिमेत सहभाग घेतला. या मोहिमेमुळे गोदापात्र, घाट स्वच्छ झाल्याने डासांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होणार आहे.
पावसाळ्यात मोकळ्या भूखंडांवर असलेल्या कचर्यामुळे दुर्गंधी निर्माण होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. तसेच पाणवेलींमुळे देखील गोदापात्र प्रवाहित न राहता पाणी तुंबून राहत असल्याने डासांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने मनपा प्रशासनाने पाणवेली काढण्याबरोबरच मोकळे भूखंड स्वच्छ करण्यात आले. मनपा आयुक्त रमेश पवार यांनी अशा प्रकारचे अभियान शहरातील प्रत्येक विभागामधील प्रभागांमध्ये मनपा कर्मचार्यांच्या माध्यमातून एकत्रितरीत्या करण्याबाबत सूचना केल्या असून, त्याची अंमलबजावणी केली जात असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांनी सांगितले.