धुळे (पिंपळनेर) : पुढारी वृत्तसेवा
पिंपळनेर पोलिसांनी एका ट्रकचा पाठलाग करत कत्तलीच्या उद्देशाने होणारी गायींची अवैध वाहतुक रोखली. या कारवाईत पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेत ट्रकसह गुरे असा १२ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस ठाण्याचे सपोनि. सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी हे रात्रीच्या वेळेस पेट्रोलिंग करत असताना नवापूरकडून एक ट्रक भरधाव वेगाने जात असताना देशशिरवाडे गावाकडून मालेगावकडे जेटी पॉइंट वरून पिंपळनेर सटाणाकडे जाणारा ट्रक क्रमांक जी. जे ०७ वाय झेड १५०४ या वाहनावर संशय आल्याने पोलिसांनी पाठलाग करुन वाहन ताब्यात घेतले. यावेळी ट्रकमध्ये गायी, वासरे आढळून आल्याने पिंपळनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
वाहन ताब्यात घेतले असता, इकलाख अजित शेख (४५) नेहरूनगर इस्लामपुरा नवापूर जिल्हा नंदुरबार व सहचालक आसिफ कलीम शाह (२७) राहणार इस्लामपुरा नवापूर जिल्हा नंदुरबार व शोहेब फारूक काकर (२०) रा. इस्लामपूर देवफली नवापूर जिल्हा नंदुरबार या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ट्रकमधून १९ गायी व ४ लहान वासरांची सुटका करण्यात आली. सपोनि सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ. पंकज दत्तात्रेय वाघ, रूपसिंग पोहऱ्या वळवी, चेतन सोनवणे, दावल सैंदाणे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोकॉ. पंकज वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.