उत्तर महाराष्ट्र

‘अग्निपथ’ विरोधात नाशिकमध्ये काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
केंद्र सरकारने लागू केलेली अग्निपथ योजना देशातील संरक्षणाच्या द़ृष्टीने अहितकारी आहे. नजीकच्या भविष्यात देशासाठी मोठ्या धोक्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा अट्टहास व्यर्थ असून ही योजना तातडीने रद्द करावी, अशी मागणी काँग्रेसने केली.

अग्निपथ योजनेच्या विरोधात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते सोमवारी (दि. 27) रस्त्यावर उतरले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाचा आशय असा की, अग्निपथ योजनेतून तयार होणारे अग्निवीर हे तांत्रिक कामाचे नसतील. आज तिन्ही संरक्षण दलांची कार्यक्षमता अत्याधुनिक व तांत्रिक उपकरणांवरच अवलंबून आहे. त्यामुळे दीर्घकालीन तांत्रिक वायुसैनिकांची भरती आवश्यक आहे. हंगामी अग्निवीर तयार करणे, हा अट्टहास असून, त्यातून काहीही साध्य होणार नाही. अग्निवीरांना सांभाळण्यात लष्कराचा वेळ वाया जाईल. त्यामुळे अग्निपथ योजना तातडीने रद्द करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली. आंदोलनात पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, डॉ. हेमलता पाटील, वत्सला खैरे, शाहू खैरे, लक्ष्मण जायभावे, राजेंद्र बागूल, सुरेश मारू, मीरा साबळे, समिना पठाण यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

15-20 वर्षांसाठी भरती करावी
भारतीय वायुसेनेत 50 टक्के वायुसैनिक हे तांत्रिक विभागात कार्यरत आहेत. लढाऊ विमाने, रडार, मिसाइल, संदेश प्रणाली, संगणक प्रणाली कार्यान्वित ठेवण्याचे काम ते करतात. या साधनांची आवश्यक देखभाल व दुरुस्ती कमीत कमी वेळेत करणे, हे वायुसैनिकांच्या कामाचे स्वरूप आहे. त्यामुळे तांत्रिक वायुसैनिकांची 15 ते 20 वर्षांसाठी तातडीने भरती करावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT