उत्तर महाराष्ट्र

नाशिक : भर उन्हाळ्यातही रामकुंडावर आढळले जिवंत पाण्याचे झरे

अमृता चौगुले

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : सध्या कडक उन्हाळा सुरू असल्याने एकीकडे अनेक ठिकाणचे जलस्रोत आटत असताना दुसरीकडे मात्र नाशिकच्या गोदाघाटावरील रामकुंडामध्ये जिवंत पाण्याचे झरे आढळले आहेत. रामकुंड परिसरात तब्बल १७ प्राचीन कुंड असून, ते पुनर्जीवित करण्यासाठी गोदाप्रेमी देवांग जानी यांचा लढा सुरू असताना हे जिवंत झरे सापडल्याने आतातरी काँक्रीटीकरणातून गोदावरीचा श्‍वास मोकळा करावा, अशी मागणी जानी यांनी केली आहे.

गोदाप्रेमी जानी यांना गुरुवारी (दि.१२) सकाळी रामकुंडासह गोदाघाट परिसरात अत्यंत नितळ आणि स्वच्छ अशा जिवंत पाण्याचे झरे आढळले. हे पाणी रामकुंडामध्ये मिसळत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. दुसरीकडे, गोदघाट परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत विविध विकासकामे सुरू आहेत. या कामात काँक्रीटीकरण करण्यात आल्याने यात प्राचीन कुंड बुजल्याचे जानी यांनी मनपाच्या लक्षात आणून दिले. याबाबत त्यांनी सर्व पुरावे गोळा करून गोदावरीला काँक्रीटमुक्त करून प्राचीन १७ कुंड पुनर्जीवित करण्याची मागणी त्यांनी लावून धरलेली आहे. त्यांच्याच मागणीमुळे स्मार्ट सिटी प्रशासनाने १७ पैकी ५ कुंडे पुनर्जीवित केली आहेत. मात्र अजून १२ कुंड पुनर्जीवित होत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार जानी यांनी केला आहे. त्यातच गुरुवारी रामकुंड परिसरात नव्याने जिवंत पाण्याचे झरे आढळल्याने जानी यांनी प्राचीन कुंड पुनर्जीवित करून गोदावरीचा श्वास मोकळा करण्याची मागणी केली आहे.

गोदाघाट परिसरात मोठ्या प्रमाणात जलस्रोत अस्तित्वात

भूगर्भ सर्वेक्षण विभागाने गोदाघाट परिसरात सर्व्हे करून जलस्रोत शोधण्यासाठी ट्रायल बोर मारण्याची सूचना मनपा प्रशासनाला केली होती. त्यानुसार अहिल्यादेवी होळकर पुलाखाली मारण्यात आलेल्या ट्रायल बोरमध्ये तब्बल एका मिनिटाला ४५ लिटर वेगाने पाणी लागले आहे. विशेष म्हणजे पाण्याचा हा वेग २४ तास अखंड आहे. तसेच, स्मार्ट सिटीच्या खोदकामातही बऱ्याचदा पाणी लागले आहे. त्यावरूनच गोदाघाट परिसरात मोठ्या प्रमाणात जलस्रोत अस्तित्वात असल्याचे सिद्ध झालेले आहे, अशी माहिती देवांग जानी यांनी दिली.

आजही गोदाघाट परिसरात अनेक ठिकाणी प्राचीन कुंड व जलस्रोत आहेत. स्मार्ट सिटीने पाच कुंड पुनर्जीवित केल्याचा दावा केला असला तरी तीठिकाणी पूर्णपणे कोरडी करून नीट तपासणी करण्याची गरज आहे. मनपा आयुक्तांनी गोदाघाटावरील उर्वरित काँक्रीटीकरण काढण्याच्या सूचना स्मार्ट सिटीच्या सीईओंना द्याव्यात.
– देवांग जानी, गोदाप्रेमी, नाशिक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT