उत्तर महाराष्ट्र

अहमदाबादमध्ये गुजराती नसतील तेवढे मुंबईत : छगन भुजबळ

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पुरस्कार रद्द झालेल्या कोबाड गांधी यांनी पुस्तकात काय लिहिले आहे. त्यांचा विचार काय आहे? पुस्तक कुणी वाचले आहे का, असा प्रश्न करत पुरस्कार नाकारलेल्यांनी पुस्तक वाचले असेल आणि सरकार त्यात लक्ष घालेल, असा विश्वास व्यक्त करत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी 'फ्रॅक्चर्ड फ्रीडम' या पुस्तकावरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया व्यक्त केली. कर्नाटक सीमाप्रश्नी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या बैठकीतून महाराष्ट्राला दिलासा मिळेल असे वाटत नाही, असे सांगत त्यांनी भाजप, शिंदे गटावर निशाणा साधला.

कोबाड गांधी यांच्या फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकाचा मराठी अनुवाद अनघा लेले यांनी केला आहे. या पुस्तकाला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार जाहीर झाला. परंतु, राज्य सरकारने वादानंतर पुरस्कार रद्द करण्याची घोषणा केली. यामुळे या पुस्तकाविषयी तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, भुजबळ यांनीही त्यावर भाष्य करत पुरस्कार रद्द करणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. राज्यातील अनेक प्रकल्प गुजरातमध्ये गेले. तरुणांचा रोजगार बुडाला. महागाई, कर्नाटक सीमाप्रश्न अशा अनेक प्रश्नांवर आंदोलन सुरू आहे. बेळगाव, कारवारला मी गेलो होतो. सध्या कर्नाटक सरकारच्या चोराच्या उलट्या बोंबा अशी पध्दत सुरू आहे. शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, असे आमदार प्रसाद लाड बोलले. भाजपने अशा लोकांना आवरावे. चंद्रकांत पाटील यांनी माफी मागितल्यानंतर पुढे आंदोलनाची गरज नाही, असेही भुजबळांनी यावेळी नमूद केले.

सर्वाधिक बहुभाषिक मुंबईत

जत, अक्कलकोट हा महाराष्ट्राचा भाग आहे. तो कदापि, कर्नाटकला मिळणार नाही. अहमदाबादमध्ये गुजराती नसतील तेवढे मुंबईत आहेत. बंगळुरूमध्ये जेवढे कन्नड भाषिक नसतील तेवढे मुंबईत आहेत. पाटणामध्ये हिंदी भाषिक नसतील तेवढे मुंबईत असल्याचे सांगत तिथल्या भागाचाही विकास झाला पाहिजे, असा प्रांतवादही भुजबळांनी उपस्थित केला.

पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह

पूर्वी पोलिसांचा धाक होता. आता पोलिसांची हाफ पॅन्टची फूल पॅन्ट झाली. पण जरब कमी झाला, असा टोला भुजबळांनी पोलिस यंत्रणेला लगावला. नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी, अमली पदार्थांचा सर्रास होणारा वापर आणि विक्री याबाबतही भुजबळांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत पोलिसांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. लोकांना नोकऱ्या नाहीत, बेरोजगारी वाढल्याने देशात गुन्हेगारी वाढल्याचा दावाही त्यांनी केला.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT