धुळे, पुढारी वृत्तसेवा: पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी पिस्तुलचा धाक दाखवत, दहशत निर्माण केल्याचा प्रकार दोंडाईचा शहरात घडला. आरोपी घटनास्थळावरून पसार झाला असून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
दोंडाईचा येथील गौसिया नगर परिसरात राहणारा नूर उर्फ नुरा पिंजारी यांच्या विरोधात फिर्यादीची बहीण आयेशाबी हिने चोरी केल्याची तक्रार दोंडाईचा पोलीस ठाण्यात दिली होती. याच रागातून नुरा पिंजारी हातात पिस्तूल घेऊन एजाज पिंजारी यांच्या घरासमोर आला. पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी त्यांने पिस्तूल दाखवून दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली. आयेशाबी यांनी केलेली तक्रार मागे न घेतल्यास पिस्तुलने ठार करण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे गौसियानगर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले हाेते.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत नूर पिंजारी हा घटनास्थळावरून पसार झाला होता. यासंदर्भात हत्यार प्रतिबंधक कायद्यान्वये आरोपीवर गुन्हा दाखल झाला असून, आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे.