नाशिक : अंजली राऊत
सण-उत्सव काळात फुलांना खूप मागणी असते. प्रत्येक धार्मिक विधी आणि सजावटीसाठी छोटे-मोठे हार व फुलांची गरज भासते. परंतु दरवर्षी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात फुलांचे भाव वाढलेले असतात. यंदाही फुलांना मागणी जास्त असल्याने आवक घटली असून, फुलांचे भावही वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांकडून कृत्रिम फुलांना पसंती दिली जात असून, नवरात्रोत्सवातही प्लास्टिक फुले व फुलांच्या तयार माळांच्या विक्रीत वाढ झाली आहे. असे असले तरी धार्मिक कार्यक्रम, पूजाविधी आणि सजावटीमुळे नैसर्गिक फुलांचे महत्त्व मात्र कायम आहे.
दरवर्षी सण-उत्सवाला श्रावणापासूनच खर्या अर्थाने सुरुवात होत असते. तेव्हापासूनच फुलांच्या मागणीत वाढ होते. गणेशोत्सव, गौराई, नवरात्रोत्सव आदी सणांमध्ये प्रामुख्याने झेंडू, शेवंती, अॅस्टर, गुलछडी, गुलाब, झरवेरा, मखमल या फुलांना अधिक मागणी असते. नवरात्रोत्सवात नाशिकच्या फूलबाजारात झेंडूच्या फुलांसाठी ठिकठिकाणावरून अधिक मागणी असून, विशेषतः मुंबई मंडईतून झेंडूची फुले जास्त मागवली जातात. यंदा अतिवृष्टीमुळे झेंडूचे मोठे नुकसान झाल्याने, दरात तब्बल 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पुरवठा कमी असल्याने दसर्याला झेंडूचे दर आणखी वाढण्याची शक्यता फूलविक्रेत्यांनी वर्तविली आहे. 30 रुपयांपासून मिळणारे लहान आकाराचे हार सध्या 60 रुपयांपासून पुढे उपलब्ध आहेत, तर मोठ्या हारांच्या किंमतीतही दुपटीने वाढ होऊन हे हार 150 रुपयांपर्यंत मिळत आहेत. त्यामुळे ग्राहकांकडून प्लास्टिकच्या अथवा कृत्रिम फुलांची आरास विकत घेण्यावर भर दिला जात आहे. एकूणच, फुलांचा भाव कितीही वाढला आणि ग्राहकांकडून कृत्रिम फुलांना मागणी वाढली असली तरी नैसर्गिक फुलांशिवाय पूजाविधी पार पडूच शकत नाही. त्यामुळे कितीही भाव वाढले तरी ग्राहक एक किलोऐवजी किमान पावकिलो तरी फुले विकत घेतात. त्यामुळे बाजारपेठेतील नैसर्गिक फुलांचा दरवळ मात्र कायम आहे.
विक्रेत्यांचे चेहरे फुलले
गणेशोत्सवानंतर पितृपक्षात फुलांचे भाव घसरल्याने नाशिकरोड येथील टाकळी रस्त्यावर एका झेंडू उत्पादकाने ढिगभर झेंडूचा माल शेताच्या बांधावर फेकून दिला होता. दरम्यान, कोरोना काळातही मंदिरे बंद असल्याने फूलविक्रेत्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. आता फुलांना भाव वाढल्याने तब्बल दोन वर्षांनंतर विक्रेत्यांचे चेहर्यावर हासू फुलले आहे. चेहर्यावरील हास्य दिवाळीपर्यंत टिकून राहण्यासाठी असाच चांगला भाव कायम राहावा, अशी अपेक्षा विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.
कोरोनानंतर फुलांना चांगला भाव आला. सण उत्सवात फुलांच्या भावात चढउतार होतच असते.नवरात्रोत्सवात पुन्हा भाव वाढले आहेत. त्यामुळे एक किलो फुले घेणारा ग्राहक पावकिलो फुले घेत आहेत. कृत्रिम फुलांना कितीही मागणी वाढली तरी नैसर्गिक फुलांशिवाय सण-उत्सव साजरे होऊच शकत नाही. उत्सवात आठवडाभराआधीच तयारी करावी लागते. फुले फ—ेश रहावी व विक्रीसाठी चांगला भाव मिळावा, यासाठी छोटे, मोठे हार तयार करून फ्रीजमध्ये ठेवावे लागतात.
– उर्मिला पंडित, फूलविक्रेता
दोन वर्षांपासून कृत्रिम फुलांना विशेष मागणी वाढत आहे. गेल्या वर्षी कृत्रिम फुलांच्या माळा घेण्यासाठी दुकानात ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. नैसर्गिक फुले विकत घेऊन दुसर्या दिवशी फेकून द्यावे लागतात, मात्र आर्टिफिशियल फुले धूवून पुन्हा वापरता येतात. फुलांच्या माळांवर पाण्याचा फवारा मारला असता ही फुले अधिक जास्त फुलतात आणि ताजी टवटवीत खर्या फुलांप्रमाणे दिसून येत असल्याने ग्राहकांची या फुलांना जास्त मागणी असते.
– वृषाली बर्वे, आर्टिफिशियल फूलविक्रेता
कृत्रिम फुलांचे भाव असे
झेंडू फुलांची मोठी माळ 60 ते 70 साधी माळ 30
आंब्याची पाने/ झेंडू मिक्स माळ 60 – 120 आकाशकंदील माळ 280 -360
झेंडू आणि पाने मिक्स माळ 80, 100, 120 वेलवेटचे तोरण 110 ते 200
मोठ्या मण्यांची माळ 1000 पर्यंत झेंडू आणि लिली मिक्स
फक्त पानांची माळ 100 200, 250, 300
शेवंती 240, झेंडू 200, गुलाब गड्डी 30, निशिगंध 320, सोनचाफा 10 रु. एक फूल, गजरा 15 रु, एक नग
गुलछडी 100 रु. पाव मोठे हार 150
छोटे हार 60 रु. मखमल 320
जरवेरा 10 फुलांच्या एक बंडलसाठी 50 रुपये झेंडू सिंगल पाकळी 32