नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आॉगस्ट महिना अक्षरश: कोरडा गेला असताना हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार परतीचा पाऊसदेखील पाठ दाखविण्याची शक्यता असल्याने जलसंपदा विभागाने धरणांतील जलसाठा आणि महापालिकेसह अन्य संस्थांसाठी आवश्यक पाणी आरक्षण व प्रत्यक्ष पाणीवापर यासंदर्भातील आकड्यांची जुळवाजुळव सुरू केली असून, येत्या १५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पाणी आरक्षण बैठकीत पाणीकपातीचे नियोजन जाहीर होण्याची शक्यता आहे. मराठवाड्याकरिता नाशिक व नगर जिल्ह्यांतील धरणांतून जायकवाडीत पाणी सोडावे लागणार असल्याने येत्या काळात पाणीसंघर्ष उभा राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
संपूर्ण राज्यात पावसाची स्थिती कमी-अधिक प्रमाणात समाधानकारक असताना धरणांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात मात्र यंदा पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. त्यामुळे एकीकडे पेरण्या वाया गेल्या असताना, आता तर जिल्ह्यातील धरणसाठा लक्षात घेता, पिण्याच्या पाण्याचादेखील प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर, दारणा व मुकणे धरणात सुरुवातीच्या पावसात पुरेसा पाणीसाठा निर्माण झाला होता. त्यानंतर मात्र पावसाने ओढ दिल्याने धरणातील पाणीपातळी घसरत आहे. सध्या गंगापूर धरणात ६११ मीटरपर्यंत पाण्याची पातळी स्थिरावली आहे. गंगापूर, काश्यपी व गौतमी अशा एकूण धरण समूहात ७९ टक्के पाणीसाठा आहे. दारणा धरणात ९५ टक्के, तर मुकणे धरणात ७८ टक्के पाणीसाठा आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडेल, असे हवामान विभागाचे म्हणणे आहे. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या आठवड्यात पाऊस विश्रांती घेईल. परतीचा पाऊस काही प्रमाणात हजेरी लावेल. त्यामुळे यंदा पावसाची तूट कायम राहणार आहे. त्यामुळे धरणांमधील पाण्याचा हिशेब ठेवण्याची तयारी पाटबंधारे विभागाने सुरू केली आहे. गंगापूर धरणातून महापालिका किती पाणी उचलते, औद्योगिक वसाहत, एकलहरे थर्मल पॉवर स्टेशन, गंगापूर डाव्या कालव्यातून पाणीवाटप संस्थांना किती पाणी पुरविले जाते, शेती व औद्योगिक कारणासाठी उचलले जाणारे पाणी यासंदर्भातील माहिती महापालिकेसह अन्य पाणीवापर संस्थांकडून मागविण्यात आली आहे. मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणातील जलसाठ्याची स्थिती लक्षात घेता, समन्यायी पाणीवाटपाचा नियमदेखील चिंता निर्माण करू शकतो. मेंढीगिरी समितीच्या अहवालानुसार जायकवाडी धरण ६५ टक्के न भरल्यास वरच्या म्हणजे गंगापूर, दारणा, मुळा, प्रवरा, पालखेड, आळंदी व निळवंडे या धरणांतून पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे येत्या दिवाळीतच नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट कोसळण्याची शक्यता आहे.
प्रक्रियायुक्त पाण्याचाही हिशेब
गंगापूरसह दारणा व मुकणे धरणांतून दररोज ५०० ते ५२५ दशलक्ष लिटर्स पाणी उचलले जाते. उचलल्या जाणाया पाण्यापैकी किती पाणी मलनिस्सारण केंद्रात पोहोचते, किती पाण्यावर प्रक्रिया करून नदीमध्ये सोडले जाते. याचा हिशेबदेखील पाटबंधारे विभागाला द्यावा लागणार आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाण्याची स्थिती
गंगापूर धरण समूह
धरण क्षमता (दशलक्ष घनफूटमध्ये) साठा (कंसात टक्केवारी)
गंगापूर ५६३० ५१४० (९१)
काश्यपी १८५२ ११५८ (६२)
गौतमी १८६८ १०९१ (५८.४०)
————————————————————-
एकूण ९३५० ६८५३ (७९.०३)
————————————————————–
दारणा ७१४९ ६८०९ (९५.२४)
मुकणे ७२३९ ५६५३ (७८.०९)
—————————————————————
पाण्याचे आरक्षण (दशलक्ष घनफूट)
धरण आरक्षण
गंगापूर ४४००
दारणा १००
मुकणे १६००
एकुण 6100
हेही वाचा :