उत्तर महाराष्ट्र

धुळे: ठाकरे गटाकडून महापालिका प्रशासनाच्या निषेधार्थ रेड्याची मिरवणूक

अविनाश सुतार

धुळे; पुढारी वृत्तसेवा: धुळे महापालिकेने सुचवलेल्या वाढीव करवाढीच्या विरोधात आज (दि.३१) ठाकरे गट आक्रमक झाला. महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यासाठी रेड्याची मिरवणूक काढण्यात आली. ही करवाढ तातडीने मागे घ्यावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

धुळे महापालिकेत समाविष्ट झालेली ११ गावे आणि देवपूरसह अन्य नगरात खासगी कंपनीच्या माध्यमातून झालेल्या सर्वेक्षणाअंती करवाढ सुचवण्यात आली आहे. ही करवाढ अन्यायकारक असल्याचा दावा करत रेड्याची मिरवणूक काढून प्रशासनाचा निषेध केला. यासाठी रेडयाच्या पाठीवर मनपा आयुक्त, वाढीव घरपट्टी असा उल्लेख करून मिरवणूक काढली. यावेळी महापालिका आयुक्त, सत्ताधारी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ही मिरवणूक महापालिकेच्या प्रवेशद्वारावर नेण्यात आली. यानंतर पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

धुळे शहरात गेल्या दोन वर्षांपूर्वी एका खासगी कंपनीला ठेका देऊन जिओ मॅपिंग व ड्रोनद्वारे शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, वसुली विभागातील अधिकाऱ्यांनी मनमानी पध्दतीने पहिल्या टप्प्यात सुमारे 24500 पुनर्मूल्यांकन केलेल्या मालमत्ता धारकांपैकी 11500 मालमत्ता धारकांना नोटीसा बजावल्या आहेत. अशाच पध्दतीने सर्व शहरातील मालमत्ता धारकांना या नोटीसा बजावण्यात येणार असून हा सर्व प्रकार सर्व नियम धाब्यावर बसवून सुरू आहे. महाराष्ट्रातील 'ड' वर्ग महापालिकेंचा विचार करता धुळे शहरात मालमत्ता कर आकारणी ही सर्वात जास्त आहे.

यावेळी सहसंपर्क प्रमुख महेश मिस्त्री, संपर्क प्रमुख प्रा. शरद पाटील, महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख शुभांगी पाटील, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, महानगरप्रमुख धीरज पाटील, डॉ. सुशील महाजन, महिला आघाडीच्या हेमाताई हेमाडे, जयश्री महाजन, कैलास पाटील, नरेंद्र परदेशी, ललित माळी, भरत मोरे, संदीप सुर्यवंशी, विनोद जगताप, कैलास मराठे आदी उपस्थित होते.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT