सप्तशृंगगड पुढारी वुत्तसेवा :
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावरील नवरात्र उत्सव यात्रेतील बस पेटल्याची घटना ताजी असतानाच घाटात बस पेटल्याच्या एका अफवेने सर्वांचीच धावपळ उडाली. दिवाळीच्या सुट्ट्या सुरू असल्या कारणाने सप्तशृंगगडावर देवी दर्शनासाठी भाविक गर्दी करीत आहे. काही भाविक आपल्या खाजगी वाहनांनी व काही भाविक राज्य परिवहन मंडळाच्या एस टी बसने प्रवास करत असतात. त्यामुळे भाविकांची सुरक्षितता गडाच्या दृष्टीने महत्वाची असते.
अशातच खोडसाळ प्रकार म्हणून काल एका भाविकाने सप्तशृंगगडावरील घाटात बस पेटल्याचे सांगून अफवा पसरवली. सकाळी साडे अकरा वाजेची घटना असून बस मध्ये 40 ते 45 प्रवाशांना बस पेटल्याने बाहेर पडता येत नसल्याचे व काही जण भाजल्याची अफवा एकाने पसरवली. अशी अफवा सप्तशृंगगडावर पसरताच क्षणाचाही विलंब न करताच ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहांतोडे, ट्रस्टचे कर्मचारी तीन ते चार रूगणवाहिका, आपातकालीनचे कर्मचारी, सप्तशृंगगडावरील सामाजिक कार्यकर्ते व गावातील तरूण मंडळींच्या ताफ्यासह सर्वच दहा मिनिटांत घाटात पोहचले. परंतु घाटात कुठेच पेटलेली बस आढळून आली नाही. सर्व घाटात शोधा शोध केली. गडावर येणा-या भाविकांना बस बाबत विचारपूस करण्यात आली पंरतु असा प्रकार घाटात कुठे घडलाच नाही ही कोणीतरी अफवा पसरविल्याची माहीती लक्षात आली. रूग्णवाहीका ताफ्यासह सर्वजण गडावर आले.