खासदार संजय राऊत 
उत्तर महाराष्ट्र

खा. संजय राऊत : आता लाड महाराष्ट्राचा नवा इतिहास लिहिणार का?

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कुठे झाला, हे अवघ्या जगाला माहीत असताना सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून वारंवार नवनवीन शोध लावले जात आहेत. जणू काही अफजलखान व औरंगजेब हे यांच्या स्वप्नात येऊन काही कानमंत्र देतात, अन‌् हे बोलतात, अशा शब्दांत शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी भाजपचे प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर आगपाखड केली. आता हे महाराष्ट्राचा नवा इतिहास लिहिणार आहेत का, असा संतप्त सवालदेखील त्यांनी केला. नागपूरमधील कर्नाटकाच्या फलकावरून खा. राऊतांनी आ. आशिष शेलारांवरही निशाणा साधला.

भाजपचे नेते लाड यांनी शनिवारी (दि. ३) एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आणि बालपण रायगडावर गेले, असे वादग्रस्त विधान केले. रविवारी (दि. ४) नाशिक दौऱ्यावर आलेल्या खा. राऊत यांचे लक्ष पत्रकारांनी या वक्तव्याकडे वेधले. त्यावर कोण प्रसाद लाड? ते तर भाजपचे पोपट आहेत, अशी शेलकी टीका खा. राऊतांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नीती आयोगाची स्थापना करून त्यावर मित्रांची वर्णी लावली. त्याप्रमाणे भाजपने नवीन इतिहास मंडळे स्थापन करून त्यावर लाडसारख्या लोकांची नेमणूक केली. ते लाेक काहीही वक्तव्ये करत आहेत. पण, छत्रपती शिवाजी महाराज यांची शक्ती त्यांना खतम करेल. महाराजांची भवानी तलवार यांच्या पक्षाचे मुंडके छाटेल, अशा शब्दांत खा. राऊतांनी भाजपवर टीकेची झोड उठविली. नागपूरमध्ये कर्नाटकाच्या समर्थनार्थ झळकलेल्या फलकावरूनही खा. राऊतांनी भाजपला खडे बोल सुनावले. हा फलक म्हणजे सरकार व महाराष्ट्राला दिलेले आव्हान आहे. त्यामुळे आरे ला कारे ने उत्तर देण्याची भाषा करणाऱ्या आशिष शेलारांना कर्नाटक आत घुसलेय असे सांगा. शेलार, तुम्ही कधी कारे करणार, असे आव्हान खा. राऊतांनी दिले. 'चुल्लूभर पानी में डूब जाओ' अशी तुमची अवस्था झाली आहे. त्यामुळे आता 'आरे ला कारे' करण्याची जबाबदारी विराेधी पक्षाची आहे, असा इशाराही खा. राऊतांनी दिला.

'दिल्ली'कडून कारवाई व्हावी

खा. उदयनराजे भोसले यांच्या आंदोलनावर खा. राऊतांना विचारले असता, जे लोक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अभद्र भाषा वापरतात, ते आम्हाला काय साेडणार. खा. उदयनराजे आणि माजी खासदार संभाजीराजे भोसले हे आपापल्या पद्धतीने जागरूकता करत आहेत. लवकरच विरोधी पक्षही भूमिका जाहीर करतील, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती संस्थांची सध्या काय अवस्था आहे, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी प्रकरणी पंतप्रधान व गृहमंत्र्यांकडून कारवाईची मागणी खा. राऊतांनी केली.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT