उत्तर महाराष्ट्र

सलमान खान याच्या एंट्रीला चित्रपटगृहात आतषबाजी; अज्ञातांविरोधात गुन्हा

अमृता चौगुले

कोरोना साथ नियंत्रण निर्बंध शिथिल झाल्यानंतर पुन्हा सुरु झालेल्या चित्रपटगृहात प्रदर्शित 'अंतिम' या चित्रपटातील सुपरस्टार सलमान खान याच्या एंट्रीला फटाक्यांची तुफान आतीषबाजी झाल्याचा प्रकार शहरातील सुभाष चित्रपटगृहात घडला. शुक्रवारी (दि.26) रात्री अखेरच्या शो ला हा प्रकार घडला. याप्रकरणी अज्ञातांविरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मालेगाव केवळ यंत्रमागासाठीच नव्हे तर, चित्रपट शौकीनांसाठीही ओळखले जाते. अभिनेत्यांचे फॅन क्लब याठिकाणी आहेत. अलिकडच्या काळात शाहरुख खान आणि सलमान खान यांच्या चाहत्यांचा अतीउत्साह प्रेक्षक आणि प्रशासनासाठी डोकेदु:खी ठरत आहे. कोरोनामुळे चित्रपटगृह बंद होते. ते आता पुन्हा सुरु झाले अन् सलमान खान यांची भूमिका असलेला अंतिम हा चित्रपट शुक्रवारी (दि.26) प्रदर्शित झाला.

शुक्रवार आणि त्यात सलमानचा चित्रपट यामुळे रात्रीच्या शो ला तुफान गर्दी झाली होती. चित्रपटात सलमान खान याची एंट्री होताच टाळ्या शिट्ट्यांचा कडकडाट सुरु होता. त्यातच काही अतीउत्साही तरुणांनी सोबत आणलेल्या फटाक्यांची आतषबाजी केली. यामुळे एकच गोंधळ उडून चित्रपटगृह धुराने व्यापले गेले. फटाक्यांच्या आगीचे लोळ उठले. व्यवस्थापनाच्या खबरीनंतर छावणी पोलिसांनी तत्काळ धाव घेतली.

या गोंधळामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांना फटका बसला. याप्रकरणी पोलिस कर्मचारी एम. व्ही. जाधव यांच्या फिर्यादीवरुन सिनेमागृहाचे व्यवस्थापक आणि आतषबाजी करणार्‍या अज्ञात तरुणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. चित्रपटगृह चालकांनी विनापरवानगी चित्रपटगृह सुरु केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने त्यांना नोटीस बजावून सेंटर बंद करण्यात आले आहे.

चित्रपट गृहात गोंधळ घालण्याची प्रथा

चित्रपट गृहामध्ये आपल्या आवडत्या कलाकाराच्या प्रवेशाला गोंधळ घालण्याची प्रथाच पडली आहे. त्यात आता थेट आतषबाजी करित इतरांच्या जीविताला धोका पोहोचविण्यापर्यंत शौकिनांची मजल गेली आहे. कोरोना काळात मध्यंतरी मिळालेल्या शिथिलतेतही त्यात फरक पडला नव्हता. फेब्रुवारी 2021 मध्ये सेंट्रल सिनेमागृहात शाहरुख आणि सलमानच्या एंट्रीला असाच प्रकार घडला होता. विशेष म्हणजे, 25 वर्षांपूर्वी रिलिज होऊन अनेक वेळा टीव्हीवर प्रदर्शित झालेल्या करण – अर्जुन या सिनेमाप्रसंगी ही हुल्लडबाजी झाली होती.

तर, 19 मार्च 2021 ला मोहन थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या मुंबई सागा सिनेमाचे तिकीट घेण्यापासून आत प्रवेश मिळवताना प्रचंड रेटारेटी व गोंधळ झाला होता. कोरोना काळात शारीरिक अंतर राखण्याच्या निर्देशांची पायमल्ली झाल्याने व्यवस्थापनावर गुन्हा दाखल होऊन थिएटर सील केले गेले होते. चित्रपटगृहातील आतिषबाजी प्रकरणी गंभीर गुन्हे नोंदविल्यानंतरही शौकींनांवर त्याचा काहीही परिणाम झाला नसल्याचे शुक्रवारच्या घटनेनंतर स्पष्ट झाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT