उत्तर महाराष्ट्र

धावत्या कार समोर लाकडी ओंडका टाकून दरोडा ; नाशिकच्या व्यावसायिकास लुटले

गणेश सोनवणे

धुळे पुढारी वृत्तसेवा : मुंबई-आग्रा महामार्गावर बाभळे फाट्यानजीक धावत्या कार समोर लाकडी ओंडका टाकून आठ ते दहा दरोडेखोरांनी नाशिक येथील बांधकाम व्यावसायिकास लुटल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून जिल्हा पोलीस दलाने तातडीने पथके तयार करून दरोडेखोरांना शोधण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

शिंदखेडा तालुक्यात असणाऱ्या बाभळे फाट्याजवळ भल्या पहाटे हा प्रकार घडला आहे. नाशिक येथील बांधकाम व्यावसायिक कैलास जाधव यांची आई इंदोर येथे राहते. तिची प्रकृती खराब असल्यामुळे जाधव परिवार आईची तब्येत पाहण्यासाठी इंदोर येथे गेले होते. तेथून रात्री त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. पहाटे चार ते साडेचार वाजेच्या सुमारास त्यांची कार बाभळे फाट्यानजीक आली. यावेळी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या कारसमोर लाकडी ओंडका टाकला. या ओंडक्यावरून कारचे चाक गेल्यामुळे टायर पंचर झाल्‍याने चालकाने गाडी रस्त्याच्या कडेला लावली. मात्र याच वेळी समोरून आठ ते दहा तरुणांचा जमाव पळत येताना त्याने पाहिला.

त्यामुळे त्यांनीदेखील गाडीचे दरवाजा उघडून अंधारात स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र दरोडेखोरांपैकी दोघांनी त्याला बेदम मारहाण केली. तर उर्वरित दरोडेखोरांनी गाडीत बसलेल्या जाधव परिवारातील महिलांकडून रोकड आणि दागिने काढून घेतले.

अवघ्या काही मिनिटात हा प्रकार झाल्यानंतर दरोडेखोरांनी तिथून पळ काढला. यानंतर जाधव परिवाराने काही वाहनचालकांना थांबवून ही माहिती दिली. दरम्यान ही माहिती नियंत्रण कक्षाला मिळाल्यामुळे तातडीने हालचाली सुरू झाल्या. अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवंत तसेच शिंदखेडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक भाबड यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची माहिती घेतली. तसेच घटनास्थळा जवळील शेतांमध्ये चोरट्यांचा माग शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. दरम्यान या संदर्भात शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT