उत्तर महाराष्ट्र

निमित्त : ‘शाश्वत’ विकास अन् कृतीची जोड

अंजली राऊत

नाशिक : शेखर गायकवाड

शिक शहराचा विकास होत असताना पर्यावरणाच्या बाबतीत बर्‍याच काही घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्रामध्ये माथेरान, महाबळेश्वर, तोरणमाळ यानंतर थंड हवेचे ठिकाण म्हणून नाशिकचे नाव घेतले जायचे. नाशिकचे भौगोलिक वातावरण व नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे येथील हवामानात एक वेगळा असा आल्हाददायकपणा जाणवत होता. मात्र, नाशिकचे हे 'वैभव' काळानुरूप हरवले असून, त्या पाठीमागे विविध कारणेही आहेत. त्यापैकीच स्थानिक प्रशासनाने दूरदृष्टी न ठेवता शहराचा 'विकास' साधण्यावर लक्ष केंद्रित केले. विकासाला 'शाश्वत'शब्दाची अन कृतीची जोड प्रशासनाने न दिल्याने नाशिककर महत्त्वपूर्ण गोष्टी गमावून बसले आहेत. भविष्यात विकास साधताना आत्मपरीक्षण करत दूरदृष्टिकोन ठेवत शाश्वत विकासाची कास धरणे अपेक्षित नव्हे तर काळाची गरजच आहे, असे म्हणणे वावगे होणार नाही.

निसर्ग व पर्यावरण हेच नाशिकला आल्हाददायक हवामानाचे शहर बनवते. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे विकासकामांचे निर्णय घेताना याच्याशी तडजोड होता कामा नये. पर्यावरणपूरक समतोल शाश्वत विकास कसा साधायचा याचा सखोल विचार होणे आवश्यक आहे. 'पुढच्यास ठेच मागचा शहाणा' या उक्तीप्रमाणे विकासमार्ग अवलंबला पाहिजे. 'सुवर्णत्रिकोण'मधून आपली वाटचाल होत असताना नाशिकच्या टोकाला असलेली दोन प्रमुख मेट्रो शहरे आणि तेथील विकास (?) फुगवटा आणि 'शाश्वत'सोबत तेथे झालेली प्रतारणा यामुळे त्या शहरांचा विकास होताना त्यांनी काय चुका केल्या? आणि निसर्ग, पर्यावरणाची अपरिमित हानी करत जे गमावले ते कायमचेच अन आता त्यांच्या वाट्याला येणारी वातावरण बदलाची संकटे, दुष्परिणाम हेदेखील 'शेजारी' या नात्याने नाशिककर बघत आहेत. मुंबई-पुण्याकडे बघून विकासाचे (?) घाईगर्दीने जे काही स्वप्न बघत आहोत. त्यामध्ये आपण नेमकं कायमस्वरूपी काय नष्ट करू पाहत आहोत, याचा खूप सखोल विचार आताच करणे गरजेचे आहे. कारण अजून आपण या शहरांच्या तुलनेने वेळ गमावलेली नाही. त्यामुळे गाफील राहून चालणार नाही. आपल्याकडे त्या मानाने अजून छान वातावरण आहे. आपल्याकडे जागा आणि वेळ आहे. सर्वप्रथम पाण्याचा विचार होणे गरजेचे आहे. आपल्याकडे चांगला पाऊस पडतो धरणामध्ये पाण्याचे साठे आहेत. तरीपण शहरामध्ये भूजल पातळी का खालवत आहे, याच शोध घेत कारणमीमांसा करावी लागणार आहे. काही परिसरात 15 ते 20 फुटांवर पाणी लागायचे आता ते 75 ते 100 फुटांपेक्षा खाली गेले आहे. नदी हीच शहराचा, पर्यावरणाचा एक मोठा स्रोत मानला जातो. पण, ज्या ठिकाणावरून आपल्या गंगा-गोदावरीचा उगम पावला आहे. तिथून जर आपण या गोष्टीचा आढावा घेतला तर नक्कीच एक मोठी शोकांतिका आपल्याला गंगा-गोदावरीच्या बाबतीत बघायला मिळते. ज्या गंगा-गोदावरीच्या अस्तित्वामुळे हे शहर उदयास आले तिची परिस्थिती आज काय झाली आहे?, नाशिककर म्हणून आपल्यालाच आपली लाज वाटावी अशी…! त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मागिरी पर्वतावर गोदावरीचा उगम झाला अन् तेथेच तिचा गळा घोटला गेला हे मोठे दुर्दैव..! त्या ठिकाणीच पूर्णत: काँक्रिटीकरण घालून नदीला पण हरवून बसलोय. त्र्यंबकेश्वरमध्येच आपल्याला या नदीला शोधावे लागते. हे दुर्दैवच म्हणावे लागेल. उन्हाळ्यात नाशिकचे कमाल तापमान आता चाळिशीपार जाऊ लागले आहे. एकीकडे ग्लोबल वॉर्मिंगचे संकट उभे राहिले असताना शाश्वत विकासातून आपण आपल्या शहराला वाचविले पाहिजे. ब्रह्मगिरी-अंजनेरीसारख्या, सह्याद्री पर्वतरांगेमधील महत्त्वाचे, जागतिक कीर्तीचे पर्वताचे सौंदर्य व वारसा टिकवून, पर्यटन विकास करण्यात आपण कमी पडलो आहोत. अजून वेळ गेली नाही. आपण हे सर्व टिकवून त्यांच्या अस्तित्वाला कुठे धक्का न पोहोचवता साहसी निसर्ग पर्यटन वाढवू शकतो.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT