नाशिक : जोरदार पावसाची हजेरी (छाया -हेमंत घोरपडे) 
उत्तर महाराष्ट्र

Rain update : परतीच्या पावसाने नाशिकला झोडपले

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहर व परिसराला सोमवारी (दि. 17) परतीच्या पावसाने झोडपून काढले. साधारणत: अर्धा तास झालेल्या या तुफान पावसाने रस्ते जलमय झाले. त्यामुळे नाशिककरांची धांदल उडाली होती, तर विक्रेत्यांना मोठा दणका बसला.

राज्याच्या विविध भागांमध्ये गेल्या तीन ते चार दिवसांपासून परतीच्या पावसाने धुवाधार हजेरी लावली. नाशिक शहरात सकाळपासूनच ढगाळ हवामान होते. दुपारी 3 च्या सुमारास अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शहराच्या मुख्य भागांमधील रस्त्यांवरून अवघ्या काही मिनिटांमध्ये पाण्याचे पाट वाहू लागले होते. तसेच सखल भागात पाणी साचले होते. परिणामी रस्त्यांवरील वाहनांचा वेग मंदावल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. याशिवाय शहरातील पंचवटी परिसर, इंदिरानगर, नाशिकरोड, सिडको, सातपूर आदी उपनगरांमध्येदेखील पावसाचा जोर अधिक होता.

स्वतः पावसात भिजत देवीच्या मूर्ती पावसापासून वाचविताना विक्रेता. (छाया : हेमंत घोरपडे)

या पावसाने शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या रविवार कारंजा, दहीपूल, मेनरोड, अशोकस्तंभ, शिवाजी रोड आदी भागांमध्ये दिवाळीनिमित्त विविध वस्तूंची दुकाने थाटलेल्या छोट्या-मोठ्या विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले. दिवाळीनिमित्त सहकुटुंब घराबाहेर खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नाशिककरांची पावसाने त्रेधातिरपीट उडवली. कुटुंबातील बच्चेकंपनीचा पावसापासून बचाव करण्यासाठी महिलावर्गाची धावपळ उडाली होती. दरम्यान, हवामान खात्याने पुढील दोन दिवस नाशिक शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी परतीचा पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज वर्तविला आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT