साक्री : येथील तहसील कार्यालयात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत बोलताना आयएएस सत्यम गांधी,शेजारी डॉ.रवींद्र शेळके, साहेबराव सोनवणे,साजन सोनवणे,रवींद्र देशमुख आदी. (छाया: अंबादास बेनुस्कर) 
उत्तर महाराष्ट्र

पिंपळनेर : साक्री पोलीस ठाणेतर्फे शांतता कमिटीची बैठक

अंजली राऊत

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
साक्री हा पुरोगामी विचारसरणीचा तालुका म्हणून ओळखला जात असून कोणतेही अनुचित प्रकार शहरासह तालुक्यात घडलेले नाहीत. या पुढील काळात देखील हिंदू-मुस्लिमांसह सर्व जाती धर्मीय समाज बांधव एकत्र गुण्यागोविंदाने राहणार असून कुठल्याही प्रकारे शहरासह तालुक्याची शांतता भंग न होता सौहार्दाचे वातावरण कायम राहील अशी ग्वाही सर्वधर्मीय समाजबांधव प्रतिनिधींकडून शांतता कमिटीच्या बैठकीत देण्यात आली.

आषाढी एकादशी तसेच बकरी ईद हे सण एकाच दिवशी येत असताना तालुक्यासह शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याच्या अनुषंगाने पोलिस प्रशासनातर्फे शांतता समिती बैठक तहसील कार्यालयातील छत्रपती शाहू सभागृहात घेण्यात आली. अप्पर तहसीलदार आयएएस सत्यम गांधी, प्रांताधिकारी डॉ. रवींद्र शेळके, उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे, तहसीलदार साहेबराव सोनवणे, पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख, उपनिरीक्षक रोशन निकम, नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष बापूसाहेब गिते, नगरसेवक सुमीत नागरे, भाजप तालुकाध्यक्ष बेडू सोनवणे, काँग्रेस तालुकाध्यक्ष भानुदास गांगुर्डे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस प्रा.नरेंद्र तोरवणे, याकूब पठाण, आरिफ शेख, व्यापारी राजेंद्र संचेती, हुकुमचंद जैन, दिलीप टाटिया, भाजप पदाधिकारी राकेश दहिते, योगेश भामरे, ॲड सुरेश शेवाळे, भूषण ठाकरे, अनिल पवार, स्वप्नील भावसार, विनोद पगारिया, शिवसेनेचे बाळा शिंदे आदींसह हिंदू मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते. उपस्थित अधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर पोलिसांचा वॉच असल्याचे सांगत यापुढील काळात सोशल मीडियातून अफवा पसरवणाऱ्या, चुकीचे संदेश प्रसारित करणाऱ्या तसेच शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे बैठकीप्रसंगी सांगण्यात आले. आरिफ शेख म्हणाले, आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी येत असताना एकादशीच्या दिवशी कुर्बानी न देता दुसऱ्या दिवशी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT