उत्तर महाराष्ट्र

पिंपळनेर : धामंदर शिवारात वाहनांतून अवैध तस्करी ; पोलिसांच्या कारवाईमध्ये 19 लाखांचा ऐवज जप्त

अमृता चौगुले

पिंपळनेर, पुढारी ऑनलाईन डेस्‍क :  साक्री तालुक्यातील धामंदर शिवारातील विरखेल धरणाच्या बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये अवैध मद्याचा साठा करून त्याची वाहनांतून गुजरातमध्ये तस्करी करण्यात येत होती. याबाबत पिंपळनेर येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे यांना रविवारी माहिती मिळाली.

सुत्राच्या माहितीनुसार, पथकाने धामंदर शिवारातील संबंधित शेडवर छापा टाकला असता तेथे फॉर्च्युनर वाहनातून होणारी मद्याची तस्करी उघडकीस आणली. पोलिसांनी फॉर्च्युनर वाहनासह १८ लाख ८० हजार ७२० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला.पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी सर्व पोलिस ठाण्यांच्या अधिकार्‍यांना अवैध धंदे तसेच आंतरराज्य मद्य तस्करीचे समूळ उच्चाटन करण्याचा आदेश दिला आहे. त्याअनुषंगाने येथील पोलिस ठाण्यातर्फेही आंतरराज्य व आंतरजिल्हा सीमांवर वेळोवेळी पेट्रोलिंग तसेच तपासणी करण्यात येत आहे. येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे यांना रविवारी रात्री अकराला पोलिस ठाणे हद्दीतील धामंदर शिवारातील विरखेल धरणाच्या बाजूला एका पत्र्याच्या शेडमध्ये अवैध मद्यसाठा करून त्याची वाहनांतून गुजरातमध्ये तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली.

साळुंखे यांच्यासह पथकाने विरखेल धरणाच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडवर लगेच छापा टाकला. यावेळी संदीप राजकुमार शर्मा (वय २४,रा. लोहाणे,ता.जि.भिवाने, हरियाना) व प्रकाश मोहन बागूल (वय २३,रा.पिंपळनेर,ता.साक्री) हे फॉर्च्युनर वाहनाच्या (एमएच ४३/एबी ४१११) डिकीत विदेशी मद्याच्या बाटल्या ठेवत असल्याचे आढळले.त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्यांनी सलीमभाई ऊर्फ विकीभाई याच्या मदतीने अवैध मद्याची खरेदी करून ते विरखेल धरणालगत पत्र्याच्या शेडमध्ये साठा करत त्याची गुजरातमध्ये चोरटी वाहतूक केली जात असल्याचे सांगितले.

चार लाखांचा मद्यसाठा जप्त

पोलिसांनी वाहनासह पत्र्याच्या शेडमधील मद्यसाठ्याची पाहणी करत तो ताब्यात घेतला. यात वाहनाच्या डिकीतून ९४ हजार ३६० रुपयांच्या व्हिस्कीच्या १३४८ बाटल्या,तसेच शेडमधून विविध कंपन्यांची व्हिस्की व बिअरचा दोन लाख ७८ हजार ३६० रुपयांचा साठा आणि १५ लाखांचे पांढर्‍या रंगाचे फॉर्च्युनर वाहन असा एकूण १८ लाख ८० हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध विविध कलमांन्व्ये गुन्हा दाखल झाला. पोलिस उपनिरीक्षक प्रदीप सोनवणे तपास करत आहेत.

या पथकाने केली कारवाई

पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील,अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव,उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे, एलसीबीचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली येथील सहाय्यक पोलिस निरीक्षख सचिन साळुंखे, उपनिरीक्षक प्रदीप सोनवणे, हवालदार प्रकाश सोनवणे, हवालदार मनोज शिरसाट, पोलिस नाईक विशाल मोहने, दत्तू कोळी,पोलिस शिपाई राकेश बोरसे,मकरंद पाटील,विजय पाटील, सोमनाथ पाटील, चालक पोलिस शिपाई दावल सैंदाणे, पंकज वाघ यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हे ही वाचलं का  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT