उत्तर महाराष्ट्र

नवरात्रोत्सव : शक्तीचे प्रेरणास्थान; वणीची महिषासूरमर्दिनी जगदंबादेवी

अंजली राऊत

नाशिक : महात्म्य नवरात्रोत्सवाचे : अनिल गांगुर्डे

वणी म्हटले की, डोळ्यासमोर उभी राहते वणीची सप्तशृंगीमाता. अठराभुजा, भव्यदिव्य रूप, साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे शक्तिपीठ म्हणून ओळखले जाते. पुरातनकालीन श्री जगदंबादेवीने म्हणजे सप्तशृंगीमातेने महिषासुरास नऊ दिवस युद्ध करून ठार मारले. ती ही वणीची जगदंबामाता. या दोन्ही ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर यात्रा सफल होते, अशी आख्यायिका आहे. कोजागरी पौर्णिमेला जलाभिषेक करण्यासाठी कावडीधारक येतात. ते प्रथम वणीच्या जगदंबामातेचे दर्शन घेऊनच पुढे गडावर जातात. आजही सप्तशृंगीमातेला वणीची देवी म्हणून संबोधले जाते. वणीला ऐतीहासिक महत्त्व आहे. सप्तशृंगीमातेचे मूळ रूप समजल्या जाणार्‍या श्री जगदंबामातेची मूर्ती पार्वतीबाई पुणेकर यांनी स्थापन केली आहे. 350 हून अधिक वर्षे पुरातण असलेले मंदिर हेमाडपंती असून, त्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते तीनमजली आहे. मूळ मंदिर काळ्या दगडी चिर्‍यांचे आहे. देवीच्या मंदिरात गाभार्‍याबाहेरील प्रदक्षिणा मार्गावर अडीच फूट उंचीचे चार पुरातन दरवाजे असून, बाजूच्या दरवाजाने महिला भाविक दर्शनासाठी येतात.

...अन् तेजस्वी रूप साकारले
पूर्वी असलेली मूर्ती जीर्ण झाल्याने समाजाच्या पंचांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने 1913 मध्ये विधिवत मूर्तीची स्थापना केली. परंतु या मूर्तीची झीज झाल्याने 1928 मध्ये पुन्हा त्याच धातूच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. परंतु ही मूर्तीसुद्धा जीर्ण झाल्याने 1951 मध्ये तांब्याच्या धातूपासून घडविलेली तेजस्वी, आकर्षक, मनोहारी व पूर्वाभिमुख मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पुन्हा 2010 मध्ये देवीचे वज्रलेपन काढण्यात आले. हे काम तब्बल 45 दिवस चालले होते. देवीच्या अंगावरचा जवळपास 100 किलो शेंदराचा लेप हा विधिवत काढण्यात आला. हे काम पुण्याचे परब आणि कंपनीने केले होते. विश्वस्तांनी पुरातत्त्व विभागाची परवानगी घेऊन काम केले होते. काढलेल्या वज्रलेपामुळे जगदंबामातेच्या मूर्तीला नवीन झळाळी आली आहे. जगदंबामातेचे मनमोहक रूप पुढे आले. देवीच्या मूर्तीची उंची सहा फूट असून, डोक्यावर चांदीचा मुकुट, कानात चांदीची कर्णफुले, नाकात मोती जडविलेली सोन्याची नथ, गळ्यात मंगळसूत्र असा साजशृंगार करण्यात आला आहे. देवीला नऊवार पातळ लागते. देवी मंदिरासमोर तीन तीर्थांचे पेशवेकालीन तलाव आहेत. त्यात ऋषींनी तर्पणविधी केला आहे. काही वर्षांपूर्वी वेदशास्त्री शंकराचार्य यांनी नवचंडी महायाग यज्ञ केला होता. त्यांच्या तपश्चर्येमुळे दुग्धगंगा वाहिली होती, अशी आख्यायिका आहे. दानशूर बडोदेकर, अहिल्यादेवी होळकर, कै. गोधडे, गोमतीबाई गुजराथी यांनी मंदिरास धर्मशाळेच्या स्वरूपात भेटी दान दिल्या आहेत. देवी मंदिर परिसरामध्ये गणपतीचे मंदिर असून, हातात माळ जपणारी मनोहारी गजानन मूर्ती आहे. समोरील भागात दीपमाळ असून, शेजारील भागात शिवमंदिर, तुळशीवृंदावनामागील भागात रामानंद स्वामींचा मठ व समाधी आहे. जगदंबादेवीच्या मूर्तीखाली 10 ते 12 फूट खोलीवर चार स्वयंभू चिंरजीव म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश व नारायण हे देवीचे पूत समजले जातात. त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा आज जरी तेथे आढळत नसल्या, तरी त्या ठिकाणी नऊ ते दहा फूट अंतरावर हळद-कुंकवाच्या भंडार्‍याचा जाड थर आहे, ज्यावर आदिमाया विराजमान झालेली आहे. देवीच्या तीर्थकुंडात ब्रह्मा-विष्णू-महेश व ऋषींनी तसेच संतांनी तर्पणविधी केला आहे. दसर्‍याला जगदंबामातेच्या पालखीची सवाद्य मिरवणूक काढून सीमोल्लंघन करण्यात येते. त्या ठिकाणी प्रतीकात्मक कोहळ्याचा बळी देऊन सोने लुटण्यात येते. ही शेकडो वर्षांपासून चालत आलेली परंपरा आजही कायम आहे. येथे सर्व जाती-धर्माचे लोक येतात. परंपरेनुसार भारतात तीन ठिकाणी सीमोल्लंघनाची परंपरा आहे आणि ते म्हणजे कोल्हापूर, म्हैसूर, वणी ही तीन ठिकाणे होय.

आठव्या माळेला शतचंडी यज्ञ
नवरात्रोत्सवात विधिवत पूजा होतात तसेच जगदंबामातेच्या धातूच्या प्रतीकात्मक मुखवट्याची सवाद्य मिरवणूक काढण्यात येते. घटस्थापनेच्या दिवशी मंदिरात घटस्थापना केली जाते. दरवर्षी थोरात देशमुख कुटुंबाचा पूजेचा मान असतो. वणीची परंपरा राखत नऊ दिवसांच्या प्रत्येक दिवशी पूजेचा मान प्रत्येक समाजाला ठरलेला असतो. रोज मंदिरात देवी भागवत महात्म्यावर प्रवचन असते. आठव्या माळेला शतचंडी यज्ञ केला जातो व रात्री 12.00 वाजेला प्रतीकात्मक कोहळ्याचा बळी देण्याची प्रथा आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT