नाशिक : जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीत स्थलांतरीत होण्यासाठी प्रशासनाने पुन्हा एकदा तयारी केली आहे. प्रशासनाने जुलै महिन्याच्या मुहूर्तावर स्थलांतर करण्याचा निश्चिय केला आहे. पहिल्या टप्प्यात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी निगडीत सर्व विभागांचे स्थलांतरीत होतील. दुसऱ्या टप्यात उर्वरित विभाग स्थलांतरीत केले जाणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले.
त्र्यंबक रोडवरील एबीबी सर्कलवर जि .प. प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तीन मजल्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर मार्च महिन्याचा मुहूर्त काढत प्रशासनाने स्थलांतरीत करण्याची तयारी केली होती. मात्र, इमारतीच्या वरील तीन मजल्यांचे बांधकाम सुरू असल्याने तसेच फर्निचरचे काम अपूर्ण असल्याने या स्थलांतराचा मुहूर्त हुकला होता. त्यानंतर, प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला इमारतीचे काम तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. मित्तल दर आठवड्यातील शुक्रवारी इमारतीचा पाहणी करून, कामाचा आढावा घेत होत्या. इमारतीचे पहिल्या टप्प्यातील काम अंतिम टप्प्यात असून ३० जूनपर्यंत त्यांना काम पूर्ण करण्याचे आदेश आहेत. त्यामुळे जुलैमध्ये प्रशासन इमारत स्थलांतरीत करण्याची तयारीत आहे. पहिल्या टप्यात मित्तल यांच्याशी निगडीत असलेले ग्रामपंचायत, महिला व बालकल्याण, शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा या विभाग स्थलांतरीत होतील. तर दुसऱ्या टप्प्यात अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अधिपत्याखालील विभागांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. यात बांधकाम, कृषी, पशुसंवर्धन, जलसंधारण आदी विभागांचा समावेश होतो.
दरम्यान नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाची मंत्री छगन भुजबळ हे शनिवारी (दि.21) सकाळी 11 वाजता पाहणी करणार आहे. यापूर्वी तत्कालील पालकमंत्री तथा शिक्षणमंत्री दादा भुसे, ग्रामविकास विभागाचे सचीव एकनाथ डवले यांनी पाहणी केली होती.