

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची विशेष सर्वसाधारण सभेचे ४ जुलै रोजी आयोजन केले आहे. दुपारी १ वाजता महाकवी कालिदास कलामंदिरात ही सभा होईल. जिल्हा बँकेने आणलेल्या नवीन कर्ज सामोपचार योजना (ओटीएस) आणली असून, त्यास या सभेत मंजुरी घेतली जाणार आहे.
आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा बॅंकेला वाचविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेत, एप्रिल महिन्यात बैठक घेतली होती. या बैठकीत शेतकऱ्यांनी मुद्दल भरतो, व्याज माफ करा या मागणीचा काहीसा विचार राज्य शासनाने करून थकबाकीदार शेतकऱ्यांना व्याजदरात सवलती देण्याचा निर्णय घेतला होता. यात प्रामुख्याने चक्रवाढ व्याज टाळून व्याजात सवलती देऊन मुद्दल वसुलीवर भर देण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतर काहीच हालचाली झाल्या नाहीत.
एक लाखापर्यंत 2 टक्के
एक ते पाच लाखांपर्यंत - 3 टक्के
पाच ते सहा लाखांपर्यंत - 4 टक्के
सहा ते दहा लाखांपर्यंत - 5 टक्के
25 टक्के थकबाकी भरण्याची सक्ती
व्याजात सवलती दिल्यानंतर सहा महिन्यांचे हप्ते करून द्यावे.
राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांची बॅंकेचे संस्थात्मक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर अनास्कर यांनी या व्याजदरात सवलत ही नवीन कर्ज सामोपचार योजना लागू करण्याच्या सूचना केल्या. या नवीन योजना लागू करण्यासाठी तिला बॅंकेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी आवश्यक आहे. त्यासाठी येत्या ४ तारखेला बँकेची सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली आहे. सभेपूर्वी तालुकानिहाय २५ व्यक्तींची वैयक्तिक निवड करण्यात येणार आहे. सभा सुरू होण्यापूर्वी एक तास अगोदर ही प्रक्रिया पूर्ण होईल. नवीन "ओटीएस' योजनेतून शेतकऱ्यांना व्याजमाफीची अपेक्षा लागली आहे. तसेच मुद्दल रकमेचे दहा हप्ते करून देण्याची शेतकरी संघटनेची मागणी आहे. सभेत यावर काही निर्णय होतो का याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.