नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जाहीर करण्यात आलेल्या गट- गण प्रारूप आराखड्यावर विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे झालेल्या सुनावणीनंतर, गेडाम यांनी काही दुरुस्त्या, नवीन बदल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा निवडणूक शाखेने बदल करत गट व गणाची अंतिम रचना निश्चित केली आहे. अंतिम झालेली रचना सोमवारी (दि. १८) विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांच्याकडे सादर केली जाणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याच्या आदेशानंतर जिल्हा परिषदेच्या गट- गण रचनेचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात आले आहे. चांदवड, सुरगाणा आणि मालेगाव या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक गट वाढल्यामुळे त्यानुसार नकाशे तयार करण्यात आले होते. यानंतर, गट, गण प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला होता. यावर हरकती मागविण्यात आल्या होत्या. यात, जिल्ह्यातून एकूण ६४ हरकती प्राप्त झाल्या होत्या.
सर्वाधिक हरकती निफाड तालुक्यातून १९, त्या खालोखाल नाशिक तालुक्यात १३, मालेगाव १३, चांदवड ५, देवळा ३, नांदगाव ३, सिन्नर व सुरगाणा येथे प्रत्येकी २, तर त्र्यंबक, येवला, पेठ आणि कळवण येथून प्रत्येकी एक हरकत नोंदवण्यात आली होती.
इगतपुरी, दिंडोरी आणि बागलाण या तालुक्यांतून कोणतीही हरकत प्राप्त झालेली नव्हती. प्राप्त झालेल्या हरकतींवर विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांच्याकडे ७ ऑगस्टला सुनावणी झाली. प्राप्त सर्व हरकतींवर सुनावणी होऊन आयुक्त डॉ. गेडाम यांनी काही दुरुस्त्या, नवीन बदल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बदल करत जिल्हा निवडणूक शाखेने गट व गणांची प्रभाग रचना अंतिम केली असून, ती सोमवारी विभागीय आयुक्तांकडे सादर होईल. त्यानंतर शुक्रवार (दि. २२) पर्यंत विभागीय आयुक्त यांच्याकडून यास मान्यता मिळाल्यानंतर ती रचना अंतिम केली जाईल. रचना अंतिम झाल्यानंतर ती राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी सादर केली जाणार आहे.