नाशिक : जिल्ह्यातील टंचाईच्या पार्श्वभूमीवर तसेच जलजीवन मिशन अंतर्गत योजनांमधील समस्या जाणून घेण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा विभागाचे सचिव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलविलेल्या बैठकीस दांडी मारणे कार्यकारी अभियंता व उपकार्यकारी अभियंता यांना भोवले आहे.
या प्रकरणी कामात हलगर्जीपणाचा ठपका ठेवत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र महाजन, उपकार्यकारी अभियंता प्रतीक्षा नेरकर यांना एक दिवसाची वेतनकपात करत नोटीस बजावत दणका दिला आहे.
राज्यासह मान्सूनचे आगमन लांबल्याने जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठला असून, पाणीटंचाईचे संकट गंभीर झाले आहे. यातच, जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांच्या समस्या वाढल्या. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाचे सचिव यांनी व्हीसीद्वारे जिल्ह्यातील टंचाई व पाणीपुरवठा योजनांचा आढावा बैठक आयोजित केली होती.
बैठकीसाठी दुष्काळी तालुका असलेल्या सिन्नर व पेठ तालुक्यांतील प्रत्येकी पाच ग्रामपंचायतींच्या सरपंच यांना पाचारण केले होते. ओमकार पवार स्वतः बैठकीस उपस्थितीत होते. मात्र, बैठकीसाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता महाजन, नेरकर यांनी उपस्थित राहणे बंधनकारक असताना त्यांनी पाठ फिरविली. दोघेही विनापरवानगी बैठकीस गैरहजर राहिले, त्यावर, पवार यांनी महाजन व नेरकर यांच्यावर खुली नाराजी व्यक्त केली.
सात दिवसांत खुलासा करण्याचे आदेश
पाणीटंचाईसारखी गंभीर समस्या असताना विभागाच्या बैठकीस अनुपस्थितीत राहतात, या शब्दांत त्यांनी दोघांना सुनावल्याचे बोलले जात आहे. पवार यांनी दोघाही अधिकाऱ्यांना नोटीस बजावत, सात दिवसांत खुलासा मागविला आहे. तर दोघाही अधिकाऱ्यांचे एक दिवस विनावेतन करण्याचे आदेश पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. दरम्यान, बैठकीत सचिवांनी उपस्थितीत सरपंच यांच्याशी संवाद साधत, पाणीपुरवठा योजनेतील समस्यांबाबत माहिती घेतली. नेमक्य अडचणी जाणून घेतल्या. जलजीवन मिशन अंतर्गत योजनांचा निधी मिळावा, अशी मागणी पवार यांनी बैठकीत केली. तसेच जिल्ह्यातील टंचाईबाबतची माहिती यावेळी दिली.