नाशिक : गत आठवड्यात जिल्हा परिषदेतील रखडलेल्या कनिष्ठ प्रशासन अधिकारीपदी पदोन्नतीला सामान्य प्रशासन विभागातील सहायक प्रशासन अधिकारी अनिल गिते यांच्या हस्तक्षेपामुळे रद्द करण्याची नामुष्की ओढवल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी सोमवारी (दि. 25) ही प्रक्रिया राबविली.
यात सहा अधिकाऱ्यांना समुपदेशनाद्वारे पदोन्नती दिली. याशिवाय आरोग्य विभागातील 25 आरोग्य सहायक यांनाही पर्यवेक्षकपदी समुपदेशनने पदोन्नती दिली. दोन्ही पदोन्नतीनंतर पवार यांनी लागलीच कर्मचाऱ्यांना ‘ऑन द स्पॉट’ आदेश दिले. पारदर्शकपणे राबविलेल्या या पदोन्नतीचे कर्मचारी संघटना व कर्मचारीवर्गाने स्वागत केले आहे.
जिल्हा परिषदेत नियमित बदली प्रक्रिया राबविल्यानंतर आदेश देणे अपेक्षित असताना उशिराने आदेश निर्गमित झाले. त्यामुळे ग्रामपंचायतीसह आरोग्यच्या बदल्या वादात सापडलेल्या आहेत. याविरोधात तक्रारी होऊन हा वाद न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. यातच यापूर्वी झालेल्या पदोन्नतीत बळजबरीने पदस्थापना देण्यात आली होती. तसेच आदेशही वेळेत मिळाले नव्हते. त्यामुळे मोठी ओरड झाली होती. त्यामुळे पवार यांनी सोमवारी समुपदेशन पद्धतीने पदोन्नती प्रक्रिया राबवत, संबंधित कर्मचाऱ्यांना तत्काळ आदेश दिले.
सोमवारी (दि.25) रोजी सहा वरिष्ठ सहायकांना कनिष्ठ प्रशासन अधिकारीपदी पदोन्नती देण्यात आली. यात बाबुलाल पालवी, रत्नाकर शिर्के, ललित घारे, प्रथमेश गायकवाड, चंद्रकांत वैष्णव, बाळू फावडे यांचा समावेश आहे. यानंतर आरोग्य विभागांतर्गत कार्यरत आरोग्य सहायकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यात आली. यातही पवार यांनी कर्मचाऱ्यांना समुपदेशनाद्वारे ठिकाण निवडण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे आरोग्य सहायकांना अपेक्षित ठिकाण निवडता आले. यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना लागलीच आदेश प्राप्त झाले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल आदी उपस्थित होते.