नाशिक : जिल्हा परिषदेकडून बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तीन हजार ८४८ शिक्षकांना कार्यमुक्तीची प्रतीक्षा लागून आहे. दुसरीकडे या बदली प्रक्रियेत दिंडोरी, मालेगाव, नांदगाव, पेठ, सुरगाणा व येवला तालुक्यातील शिक्षकांची संख्या कमी झाली आहे तर उर्वरित तालुक्यांमध्ये शिक्षकांची संख्या वाढली आहे.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण ३२६३ शाळांमध्ये एकूण ११ हजार २०२ शिक्षकांची पदे मंजूर आहेत. प्राथमिक शिक्षण विभागाने जुलैपासून शिक्षक बदली प्रक्रिया हाती घेतली. संवर्ग एक अंतर्गत समाविष्ट होणारे दिव्यांग, दुर्धर आजाराने ग्रस्त आदी ६६२ शिक्षकांची बदली झाली. तसेच पती-पत्नी एकत्रिकरणांतर्गत (संवर्ग-२) २६२ शिक्षकांनी याचा लाभ घेतला.
पती व पत्नी यांच्यातील शाळा किंवा शासकीय कार्यालयाचे अंतराबाबबत शासन निर्णय लागू आहे. त्याआधारे या संवर्गातील शिक्षकांची बदली करण्यात आली. त्यानंतर बदली अधिकार प्राप्त ५६९ शिक्षकांची तर बदलीपात्र २ हजार २२७ शिक्षकांची बदली करणे आवश्यक ठरले. विस्थापीत संवर्गातील १३४ शिक्षकांची बदली करण्यात आली.
साधारणत: एक ते पाच संवर्गात तीन हजार ८४८ शिक्षकांची बदली प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली असताना शिक्षक संघटनांनी या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचा आग्रह धरला आहे. त्यामुळे अवघड क्षेत्रात जाण्याची इच्छा नसलेल्या शिक्षकांना ही प्रक्रिया जेवढे दिवस लांबणीवर पडेल, तेवढे दिवस सोयीचे असणार आहे. बागलाण, चादंवड, देवळा, दिंडोरी, इगतपुरी, कळवण, नाशिक, निफाड, सिन्नर, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये बदली प्रक्रियेनंतर 107 शिक्षकांची संख्या वाढलेली आहे.