नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अखेरच्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी जाणाऱ्या भाविकांची ठक्कर बाजार बसस्थानकात रविवारी रात्री मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीत एसटी बसमध्ये जागा पकडण्यासाठी झालेल्या धावपळीत एका १७ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा बसखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाला. आकांक्षा रामभाऊ शेलार (१७, रा. पळसे, नाशिकरोड) असे मृत तरुणीचे नाव आहे.
पळसे येथील करण उत्तम वारुंगसे (२१) हा त्याची आई, मावशी ज्योती शेलार तसेच चुलत बहिणी आकांक्षा व वैष्णवी यांच्यासह त्र्यंबकेश्वर फेरीसाठी निघाले होते. रविवारी रात्री सुमारे ९ वाजता ते ठक्कर बाजार बसस्थानकात पोहोचले.
फलाट क्रमांक ४४ वर त्र्यंबकेश्वरकडे जाणारी एसटी बस (एमएच ४०, वाय ५६६२) लागताच बसमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रवाशांमध्ये धावपळ व ढकलाढकली सुरू झाली. याचवेळी गर्दीच्या लोटालोटीत आकांक्षाचा तोल गेला आणि ती बसखाली कोसळली.
चालकाचे लक्ष नसताना बसचे डाव्या बाजूचे मागील चाक तिच्या कमरेवरून व पोटावरून गेले. गंभीर जखमी आकांक्षाला करणने तातडीने रिक्षातून जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
मात्र, उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी बसचालक भिका एकनाथ अहिरे (४५, रा. सेवाकुंज, पंचवटी) याच्याविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे.