येवला (नाशिक) : येथे स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन आयुक्तांना आदेश दिले आहेत. त्यामुळे लवकरच येवल्यात हे कार्यालय सुरू होण्याची शक्यता आहे. या संदर्भात मंत्री छगन भुजबळ यांनी सरनाईक यांच्याकडे शिफारस केली होती.
नाशिक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दि. ९ मे २०२४ रोजी उपप्रादेशिक कार्यालयासाठी प्रस्ताव आयुक्तांकडे पाठविला होता. मात्र, शासनाच्या धोरणानुसार जिल्ह्याचे विभाजन झाल्याशिवाय स्वतंत्र कार्यालय मंजूर करता येणार नाही, असे आयुक्तांनी दि. ७ जून २०२४ च्या पत्राद्वारे स्पष्ट केले होते. तथापि, २०२४ नंतर चाळीसगाव (जि. जळगाव), भडगाव (जि. जळगाव), फलटण (जि. सातारा), उदगीर (जि. लातूर), खामगाव (जि. बुलढाणा), वैजापूर (जि. छ. संभाजी नगर) व जत (जि. सांगली) येथे नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. या जिल्ह्यांचे विभाजन झालेले नसतानाही कार्यालये उभारली गेल्याचे भुजबळ यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे येवल्याचा प्रस्ताव केवळ जिल्हा विभाजनाचे कारण देऊन नामंजूर करणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या येवला तालुक्यातील वाहनांची नोंदणी नाशिक कार्यालयातून केली जाते. नाशिकपर्यंतचे ८० किमी अंतर नागरिकांसाठी गैरसोयीचे ठरते. तालुक्यातील वाहनांची संख्या व लोकसंख्या लक्षात घेता स्वतंत्र कार्यालयाची आवश्यकता भासते. यासाठी जागाही आरक्षित करण्यात आली आहे. त्यामुळे येवला येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय तातडीने स्थापन व्हावे, अशी मागणी मंत्री भुजबळ यांनी केली आहे.