येवला (नाशिक) : येवला मतदारसंघातील नागरिकांना सर्व शासकीय विभागांची कामे एकाच ठिकाणी सहजरीत्या पार पाडता यावीत या हेतूने शासनाने तहसील कार्यालय अर्थात भव्य प्रशासकीय इमारतीचे बांधकाम केले. तालुका कृषी अधिकारी, सामाजिक वनीकरण, उत्पादन विभाग, सहकारी संस्था निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भूमी अभिलेख, नोंदणी व मुद्रांक, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग अशी अनेक कार्यालये येथे कार्यरत आहेत. मात्र जनतेसाठी उभारलेली अन् संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श मॉडेल बनलेली ही इमारत सध्या अकार्यक्षमता, निष्काळजीपणा आणि दुरवस्थेचे प्रतीक ठरत आहे.
गेल्या कित्येक महिन्यांपासून इमारतीतील प्रसाधनगृह कुलूपबंद आहे. नागरिक दक्षिण गेटमधून प्रवेश करून प्रथम स्टॅम्प वेंडर यांच्याकडे रीतसर अर्ज प्राप्त करून नंतर विविध विभागांकडे जात असतात. परंतु तालुक्यातून येणाऱ्या सर्वसामान्य लोकांसाठी प्रसाधनासाठी कोणतीही सोय उपलब्ध नाही. यामुळे त्यांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांसाठी मात्र त्यांच्या दालनात स्वतंत्र प्रसाधनगृहाची सोय उपलब्ध आहे. तर तहसील कार्यालय व प्रांत कार्यालयाजवळील प्रसाधनगृह खुले आहे. पण स्वच्छता नाही. अधिकाऱ्यांसाठी तर सुविधा असते मात्र सर्वसामान्य जनतेसाठी दरवाजे बंद असतात.
शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या या सुसज्ज देखण्या इमारतीचे खु्द्द शरद पवार, अजित पवार आणि विविध पक्षांच्या नेत्यांनी कौतुक केले होते. मात्र सध्या दुर्लक्षामुळे इमारतीची दुरवस्था झाली आहे. इमारतीत गळती, तुटलेल्या फरशा, उडालेला रंग, जंगली झाडझुडपे, वाढलेले गवत आणि डुकरांचा वावर अशी स्थिती निर्माण झाली आहे. शासकीय कामासाठी दूरवरून आलेल्या नागरिकांना ये-जा करण्यासाठी अक्षरशः वाढलेल्या झाडा-झुडपातून वाट काढण्याची वेळ आली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या इमारतीची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असली तरी त्यांनी प्रसाधनगृहाला कुलूप लावूनच आपले “देखभालकार्य” पूर्ण केल्याचे दिसते. जनतेसाठी उभारलेली इमारतच जर जनतेच्या गरजा पूर्ण करू शकत नसेल, तर या सुसज्ज सुविधांचा उपयोग काय, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
तहसील कार्यालयाच्या भिंतीवर पिचकाऱ्या
एकीकडे शासन स्वच्छ भारत, सुंदर भारत अशा घोषणा देत असला तरी त्याच शासकीय कार्यालयाच्या म्हणजे येवला येथील तहसील कार्यालयाच्या दर्शनी भिंतीवर पान, गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारलेल्या दिसून येत आहे. विविध शासकीय कार्यालयातील अनेक कोपरे थुंकल्याने लाल झाले आहेत. यावर उपाययोजना कधी केल्या जाणार आणि कार्यालय अस्वच्छ करणाऱ्यांवर कारवाई कधी करणार, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.