Military Truck Fire Case  Pudhari News Network
नाशिक

Military Truck Fire Case | सिगारेटची ठिणगी; आयशरसह लष्कराचे साहित्य खाक

Military Truck Fire Case | ट्रक चालकाने पाच हजारांची लाच देणे नाकारल्यामुळे वादावादी

पुढारी वृत्तसेवा

येवला : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील पिंपळगाव जलाल टोल नाक्याजवळ पोलिसांनी ट्रकचालकाला नो एन्ट्रीचे कारण सांगून ३० हजार रुपयांचे चलन भर नाही, तर ५ हजार रुपये दे, अशी मागणी केल्यामुळे ट्रकचालक आणि पोलिसांत बाचाबाची झाली. चालकाने ५ हजार रुपये देण्यास नकार दिल्यामुळे पोलिसांनीच ट्रकला आग लावल्याचा आरोप प्रसारमाध्यमांसमोर ट्रकचालकाने केला. यात येवला टोल नाक्याजवळ आयशर ट्रकमधील लष्कराचे साहित्य जळून खाक झाले आहे.

पुणे-इंदूर महामार्गावर येवला टोल नाक्याजवळ शुक्रवारी (दि.१०) आयशर ट्रकने पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली. यात ट्रकमधील लष्कराचे साहित्य जळून खाक झाले. पोलिसांनीच ट्रकला आग लावल्याचा आरोप प्रसारमाध्यमांसमोर ट्रकचालकाने केला.

येवला-कोपरगाव महामार्गावर वाहतूक पोलिस वाहनांची तपासणी करीत होते. कर्तारसिंग हा ट्रकचालक पुण्याहून भटिंडा येथे लष्कराचे साहित्य घेऊन जात होता. शुक्रवारी (दि.१०) सकाळी या ट्रकला वाहतूक पोलिसांनी अडवत तपासणीच्या नावाखाली प्रवासबंदी असल्याचे कारण दाखवत ५ हजारांची मागणी केली.

चालकाने लाचेची रक्कम दिली नसल्याने संतापलेल्या पोलिसांनीच ट्रकला आग लावल्याचा आरोप चालकाने केला. याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी लक्ष घालून महामार्गावर पोलिसांकडून सुरू असलेली लूट थांबवावी, अशी मागणी विक्रमजितसिंग संधू यांनी केली. गेल्या अनेक दिवसांपासून रस्ते बंद असल्यामुळे येवला शहरातील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मंत्री भुजबळांची घटनास्थळी भेट

घटनेची माहिती मिळताच मंत्री छगन भुजबळ यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. चौकशीत ट्रकचालकाने संपूर्ण कागदपत्रे दिली असताना पोलिसांच्या संबंधित घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. या घटनेबाबत तत्काळ दखल घेण्याचे आदेश संबंधित वरिष्ठ पोलिस अधिकारी साळुंके यांना देण्यात आले आहेत.

सिगारेट ठरली घातक

प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार वादावादीदरम्यान पोलिस कर्मचाऱ्याने सिगारेट ट्रकच्या दिशेने फेकली. ट्रकमध्ये एसी गॅसचे सिलिंडर असल्यामुळे त्या ठिणगीमुळे भीषण स्फोट झाला. आगीचे गोळे आणि गॅसच्या बाटल्या हवेत उडाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती.

सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, पोलिसांच्या या अजब प्रकाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी असलेले चार ते पाच पोलिस पळून गेल्याचे ट्रकचालकाने सांगितले. त्याचे व्हिडिओदेखील काढलेले आहेत. स्थानिक प्रशासन या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT