येवला : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील हमीभाव मका खरेदी योजनेने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शासनाच्या हमीभावाने झालेल्या विक्रमी मका खरेदीमुळे तब्बल ८०० शेतकऱ्यांना तीन कोटी रुपयांहून अधिकचा आर्थिक फायदा झाला आहे.
खासगी बाजारात १,६०० ते १,७०० रुपये दर मिळत असताना शासनाने २,४०० रुपये हमीभावाने मका खरेदी केल्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ६०० ते ८०० रुपयांचा थेट फायदा झाला. तसेच यंदा सुमारे ४० हजार किंटल मक्याची खरेदी करण्यात आली असून, नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक खरेदीचा मान पटकावत येवला तालुका अव्वल ठरला आहे.
सुरुवातीला केवळ पाच हजार क्विंटल उद्दिष्ट असलेल्या खरेदी केंद्राने सातत्यपूर्ण पाठपुरावा करून ते तब्बल ४८ हजार ४०० क्लिंटलपर्यंत वाढवून घेतले. शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रकम पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर एक कोटी रुपये जमा करण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी (दि. २०) आणखी तीन कोटी रुपये वर्ग करण्यात आले.
आतापर्यंत ७९५ शेतकऱ्यांपैकी ३६४ शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण चार कोटी रुपये जमा झाले आहेत. मका खरेदीला २४ डिसेंबरपासून सुरुवात झाली असून, ३१ मार्च ही अंतिम मुदत आहे. अजूनही अनेक शेतकरी प्रतीक्षेत असले तरी खरेदी प्रक्रिया टप्प्याटप्प्याने वेगाने सुरू आहे. तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सुनील देशमुख, सचिव बाबासाहेव जाधव, संचालक मंडळ व सर्व सहकाऱ्यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून खरेदीचे उद्दिष्ट वाढवून घेत शेतकऱ्यांना फायदा मिळवून दिला.
हमीभाव योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी वेळोवेळी खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे सर्वाधिक प्रमाणात येवल्यातील शेतकऱ्यांना फायदा झाला. हमीभावामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे.- समीर भुजबळ, माजी खासदार
खरेदी प्रक्रिया पारदर्शक ठेवत प्रत्येक शेतकऱ्याला वेळेत पैसे मिळावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. एकही शेतकरी वंचित राहणार नाही, यासाठी शेवटपर्यंत खरेदी सुरू राहील.- बाबासाहेब जाधव, सचिव, तालुका खरेदी-विक्री संघ