नाशिक : सध्या राज्यभरात हवामानात झालेल्या बदलामुळे अवकाळी पावसाने सर्वत्र धुमाकुळ घातला आहे. जिल्ह्यात सलग सातव्या दिवशी अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून, हवामान विभागाने सलग तिसऱ्यांदा जिल्ह्याला 'यलो अलर्ट' दिला आहे. दरम्यान, मंगळवारी (दि.६) देखील अवकाळी पावसाने जिल्हाभरात जोरदार हजेरी लावल्याने, शेतीसह पशुधन आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मे महिन्यात सर्वाधिक उन्हाच्या झळा सोसाव्या लागतात. यंदा मात्र, मे महिना आतापर्यंतचा सर्वात थंड महिना म्हणून समोर येत आहे. महिन्याच्या प्रारंभापासूनच अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला गेला. नाशिक जिल्ह्याला सुरुवातीला ७ मेपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला होता. त्यानंतर १२ मेपर्यंत यलो अलर्ट दिला गेला. आता त्यात आणखी वाढ करून १७ मेपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. १३ ते १७ मेपर्यंत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे, हलका ते मध्यम पाऊस आणि ३० ते ४० प्रतितास वेगाने साेसायट्याचा वारा येण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्याती घाटमाथ परिसरातही काहीसे असेच चित्र राहणार आहे. तर १७ मे रोजी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मान्सून अंदमानात दाखल झाला असून, लवकरच केरळमार्गे तळकोकणातून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होणार आहे. हवामान विभागाच्या मते, ५ जून रोजी मान्सून तळकोकणामार्गे महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. १५ जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ऐकीकडे अवकाळी पावसाचा १७ मेपर्यंत अलर्ट देण्यात आल्याने, पावसाळा सुरू होईपर्यंत अवकाळीचा तडाखा कायम राहणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.