

नाशिक : आठ दिवसांपासून अवकाळीने कहर केला असून, सोमवारी (दि.12) रोजी नाशिक शहरासह जिल्ह्यात अवकाळीने चांगलाच तडाखा दिला. अवकाळीचा हा कहर पुढील दोन दिवस राहणार आहे. याबाबत हवामान विभागाकडून मंगळवार आणि बुधवार 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. तर त्यानंतर दोन दिवस 'ग्रीन अलर्ट' जारी केला आहे.
आठ दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागांत अवकाळीचा तडाखा सुरू आहे. यात काही भागांत गारपीट होऊन शेतीपिकांचे विशेषत: आंब्याच्या बागा उजाडल्या आहेत, तर कांदा पिकालाही मोठा फटका बसला आहे. नाशिक प्रमाणेच राज्यात काही भागांत आठ दिवसांपासून अवकाळीचे ढग आहेत. बहुतांश भागांत सोसाट्याचा वारा, गारपीट आणि मध्यम सरींच्या पावसाने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, अवकाळी पावसाचा मुक्काम अद्याप दाेन दिवस वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
13 मे नाशिकसह ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
14 मे - नाशिकसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, घाट माथा अहिल्यानगर, पुणे
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच कही भागात गारपिटीची शक्यता आहे. यावर्षी 50 दिवसांपेक्षा जास्त दिवस यावर्षी उष्णतेची लाट सक्रिय होती. त्यामुळे हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरातील पाणी प्रचंड तापल्यानं बाष्पीभवनाचा वेगही वाढला आहे. परिणामी यंदा मान्सून लवकर येण्याची शक्यता आहे.
अवकाळीमुळे जिल्ह्यात 795 हेक्टरवरील कांदा तर 332 हेक्टरवरील भाजीपाला कवडीमोल झाला आहे. 695 हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले असून, 524 हेक्टरवरील आंब्याच्या फळबागांचे नुकसान झाले आहे. पेठ तालुक्यात सर्वाधिक 101 घरांची पडझड झाली. त्या खालोखाल कळवण तालुक्यातील 59, बागलाण तालुक्यातील 22, मालेगाव तालुक्यातील 21 घरांचे नुकसान झाले आहे.