ठळक मुद्दे
'मासिक पाळीच्या काळात महिलांनी पूजा करावी का?' हा प्रश्न समाजात चर्चेचा विषय
स्त्रीच्या निवडीचा सन्मान करणे हेच आधुनिक समाजाचे खरे परिवर्तन
मासिक पाळी : शारीरिक विश्रांती म्हणून त्यांना धार्मिक विधींपासून अलिप्त ठेवण्याची प्रथा
नाशिक : भूमिका वाघ
दिवाळी हा प्रकाशाचा आणि आनंदाचा सण, या सणात प्रत्येक घरात लक्ष्मीपूजन, कुलदेवतेची पूजा आणि उत्सवाचे आयोजन केले जाते. मात्र. 'मासिक पाळीच्या काळात महिलांनी पूजा करावी का?' हा प्रश्न आजच्या समाजात चर्चेचा विषय ठरतो. समाजधुरीणांच्या मते परंपरेचा आदर राखत स्त्रीच्या निवडीचा सन्मान करणे हेच आधुनिक समाजाचे खरे परिवर्तन ठरणार आहे.
पारंपारिक विचारानुसार, मासिक पाळीच्या काळात महिलांना शारीरिक विश्रांती द्यावी म्हणून त्यांना धार्मिक विधींपासून अलिप्त ठेवण्याची प्रथा होती. शास्त्रांमध्ये 'शुचिर्भूत' राहण्यावर भर देण्यात आला आहे. शरीराला स्वच्छ ठेवत विश्रांती घेणे हेच त्यामागील मूळ तत्व असल्याचे काही धर्मगुरू सांगतात. वैज्ञानिक दृष्टीकोनानुसार, मासिक पाळी ही नैसर्गिक जैविक प्रक्रिया आहे.
या काळात महिलांचे शरीर शारीरिक बदलून जात असते तरी त्यांना पूजा, उत्सव किंवा कोणतेही धार्मिक कार्य करण्यास अडचण नसते. डॉक्टर आणि वैज्ञानिक सांगतात की, मासिक पाळी अस्वच्छ नव्हे तर आरोग्यपूर्ण शरीराचे लक्षण आहे. श्रद्धा आणि विज्ञान यांचा समतोल राखत समाजाने महिलांना समानतेने वागवणे गरजेचे आहे. दिवाळीची पूजा ही गरजेची बाब असली तरी ती स्त्रीच्या जैविक प्रक्रियेशी जोडणे अन्यायकारक ठरते. परिवर्तनशील काळात परंपरा बदलणे ही प्रगतीची खूण आहे. म्हणूनच, मासिक पाळीच्या काळात स्त्रीने पूजा करावी की नाही हा प्रश्न न राहता, तिच्या निवडीचा सन्मान करणे हेच समाजाचे खरे परिवर्तन ठरेल. श्रध्दा आणि विज्ञान यांचा संगम साधत दिवाळीचा प्रकाश समानतेचा संदेश देणारा ठरावा, हीच अपेक्षा आहे.
अध्यात्माच्या नावाखाली पूजा करण्याचं औढंबर माजलं. मासिक पाळीत स्त्री अशुद्ध, अपवित्र असते असं लेबल लावल्यामुळे तिला पूजेपासून दूर ठेवलं गेलं. स्त्रीच्या मासिक पाळीबाबद परंपरागत विचार कालबाह्य आहे. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला श्रद्धा, उपासनेचे स्वातंत्र्य दिले आहे. या काळात पूजा करावी की, नाही हा स्त्रीचा वैयक्तिक विचार असून श्रद्धेचा भाग आहे. त्यामुळे सर्वांनी इतरांच्या स्वातंत्र्याचा आदर करात, भीतीमुक्त वातावरण निर्माण करावे.डॉ. टी. आर. गोराणे, राज्य प्रधान सचिव, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे.
मासिक पाळीच्या काळात दिवाळीची पुजा असो वा कुठल्याही सणाला महिलेला पुजा-अर्चा करू न देणे या गोष्टींना काहीही अर्थ नाही. शारिरीक वेदनांमुळे महिलेने आराम करावा, अशा विचाराने त्यांना पुजा किंवा सणाच्या रितीरिवाजांपासून दूर ठेवण्यात आले आहे.आसावरी देशपांडे, सामाजिक कार्यकर्त्या.