नाशिक जिल्ह्यात चार महिन्यांत दगावली 151 बालके file photo
नाशिक

चिंताजनक ! नाशिक जिल्ह्यात चार महिन्यांत दगावली 151 बालके

पुढारी वृत्तसेवा
नाशिक : वैभव कातकाडे

नागरी आरोग्यव्यवस्था सक्षम करण्यासाठी शासन स्तरावरून विविध योजना राबविल्या जात असल्या तरी जिल्ह्यातील बालमृत्यूचा दर चिंताजनक आहे. गेल्या चार महिन्यांत दगावलेल्या 161 बालकांमुळे व्यवस्थेचे अपयश समोर आले आहे. यामध्ये 0 ते 1 वर्षाचे अर्भक तब्बल 122, तर 1 ते 5 वर्षापर्यंतच्या29 बालकांचा समावेश आहे. जिल्हा आरोग्य विभागाकडून मिळालेल्या अहवालातून हे धक्कादायक वास्तव उघड होते.

जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील महापालिका कार्यक्षेत्र वगळता उर्वरित जिल्ह्यातील बालकांच्या मृत्यूची नोंद ठेवली जात असते. दरवर्षी एप्रिल महिन्यापासून तालुकानिहाय ही माहिती संघटित केली जाते. त्यानुसार यंदाच्या वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत म्हणजेच जुलैअखेरपर्यंत 151 बालमृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 159 बालके दगावली होती. अल्पशी घट असली तरी ती चिंतनीय बाब ठरली आहे.

कमी वजनाची, प्रसूतिपूर्व तारखेपूर्वीच प्रसूत झालेल्या 28 बालकांचा समावेश आहे. त्या खालोखाल जंतुसंसर्ग झालेल्या 18, जन्मत:च श्वास घ्यायला त्रास असलेल्या 20, इतर आजारामुळे 23, श्वसननलिकेच्या गंभीर आजाराने 16, जन्मत:च व्यंग असलेल्या 23, न्यूमोनियामुळे नऊ अशा इतर कारणांनी बालमृत्यू झाल्याचे अहवालात नमूद केले आहे.

तज्ज्ञ समिती स्थापन करून बालमृत्यू रोखण्याबाबत प्रभावी उपाययोजना सुरू आहेत. बालमृत्यूबाबत वैयक्तिक समुपदेशन केले जाते. याचा सकारात्मक परिणाम दिसत असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. हा दर शून्यावर आणण्यासाठी आरोग्य विभागाचे नियोजन आहे.
- डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी

यंत्रणेचे प्रयत्न तोकडे

गेल्या चार महिन्यांत दगावलेल्या बालकांमध्ये 80 मुले, तर 71 मुलींचा समावेश आहे. तसेच 28 दिवसांच्या आत दगावलेले 98, 29 दिवस ते 1 वर्ष या वयोगटात 24, तर 1 वर्ष ते पाच वर्षमध्ये 29 बालके दगावली आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत बालमृत्यू दर कमी करण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळत नसल्याचे या अहवालावरून अधोरेखित होत आहे.

बालमृत्यू दृष्टिक्षेपात 

बागलाण -13

मालेगाव -5

नांदगाव-4

येवला-12

सिन्नर- 9

इगतपुरी -19

त्र्यंबक -12

पेठ-10

सुरगाणा- 10

कळवण-8

देवळा -2

चांदवड-6

निफाड -13

नाशिक -9

दिंडोरी- 19

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT