नाशिक : जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) उभारण्यात येणाऱ्या निफाड ड्रायपोर्टला अखेर मुहूर्त लागणार आहे. दिवाळीत प्रकल्पाच्या कामाचा श्रीगणेशा करण्यात येणार आहे. या ड्रायपोर्टमुळे रोजगारनिर्मिती होणार असून, नाशिकच्या कृषी व औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे.
११६.५ एकर क्षेत्रावर ड्रायपोर्ट उभे राहणार
प्रकल्पासाठी सुमारे ३०० ते ४०० कोटींचा खर्च अपेक्षित
निफाडमधून पहिल्या टप्प्यात १० हजार कंटेनरची हाताळणी
जेएनपीटीमार्फत निफाड साखर कारखान्याची १०८ एकर जमीन तसेच खासगी साडेआठ एकर अशा ११६.५ एकरवर ड्रायपोर्ट उभारण्यात येणार आहे. कारखान्याच्या जागेचा प्रश्न निकाली निघाला आहे. मात्र, खासगी क्षेत्राच्या भू-संपादनामुळे प्रकल्पाचे कामकाज रखडले होते. परिणामी प्रकल्पाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले होते. यासर्व घडामोडीत मागील आठवड्यात नाशिक दौऱ्यावर असलेले जेएनपीटीचे अध्यक्ष उन्मेश वाघ यांनी ड्रायपोर्टसंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली. सप्टेंबर अखेरपर्यंत खासगी क्षेत्राचे अधिग्रहण पूर्ण करण्यात येईल. तसेच खासगी क्षेत्राच्या भूसंपादनासाठी जिल्हाधिकारी ठरवतील, तो दर अंतिम करत बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २४ तासांत रक्कम वर्ग केली जाईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. त्यामुळे रखडलेल्या ड्रायपोर्टच्या कामाला गती मिळणार आहे.
दिवाळीत ड्रायपोर्टचे काम सुरू झालेले असेल, असा विश्वास वाघ यांनी व्यक्त केला. प्रस्तावित ड्रायपोर्ट हे रस्ते व रेल्वेमार्गे जेएनपीटीशी जोडले जाणार आहे. ते भविष्यात पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराशी कनेक्ट केले जाऊ शकते. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कृषी व औद्योगिक क्षेत्राचा विकास झपाट्याने होणार आहे. त्याबरोबरच नाशिक विभागातील धुळे, नगर, नंदुरबार व जळगाव या जिल्ह्यांसाठी हे ड्रायपोर्टचा फायदेशीर ठरणार आहे.
नाशिक हा कृषिप्रधान जिल्हा आहे. जिल्ह्यातून भाजीपाला, द्राक्ष व कांदा हे मोठ्या प्रमाणात देशांतर्गत पाठविले जाते. तसेच दरवर्षी परदेशातही मोठ्या प्रमाणात कांदा तसेच द्राक्षाची निर्यात होते. निफाड ड्रायपोर्टमुळे कृषी माल जलदगतीने पाठविणे सोपे होणार असल्याने शेतकऱ्यांना त्याचा सर्वाधिक फायदा हाेईल. याशिवाय औद्योगिक मालदेखील कमी वेळेत एक्स्पोर्ट करणे शक्य असल्याने उद्योगविश्वाची भरभराट होणार आहे.