Simhastha Maha Aarti 
नाशिक

Simhastha Maha Aarti | 'महाआरती'त महिला पुरोहित करणार गोदापूजन

Simhastha Maha Aarti | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची उपस्थिती : रामतीर्थावर उद्या जनजातीय सिंहस्थ महाआरती

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने शनिवारी (दि. ३१) रामतीर्थ येथे गोदापूजन आणि जनजातीय सिंहस्थ महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सदस्य, तेरा आखाड्यांतील संत-महंत, जगद्गुरू, शंकराचार्य आणि विविध आध्यात्मिक परंपरांतील मान्यवर सहभागी होणार आहेत.

सोहळ्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे विविध समाजघटकातील महिला पुरोहित म्हणून गोदावरी मातेच्या पूजनविधीचे नेतृत्व करणार असल्याची माहिती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोहळ्यात धार्मिक विधींचे निवेदन, पूजनविधीचे मार्गदर्शन आणि महाआरतीचे संचालन अशा महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या महिला पार पाडणार आहेत. धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात महिलांना सन्मानाचे स्थान देण्यासोबतच त्यांच्या ज्ञान, साधना आणि नेतृत्वक्षमतेचा गौरव करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. स्त्रीशक्तीचा सन्मान, समानतेची भावना आणि सर्व समाजघटकांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा संदेश या माध्यमातून दिला जाणार आहे.

श्रद्धा आणि सेवाभावाच्या बळावर महिला धार्मिक परंपरांचे जतन व संवर्धन करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतात, ही भावना या आयोजनातून अधोरेखित होणार आहे.
जनजातीय बांधवांचा सन्मानपूर्ण सहभाग हा या महाआरतीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. जनजातीय समाजाचे निसर्ग, जलस्रोत आणि पर्यावरणाशी असलेले अतूट नाते लक्षात घेऊन त्यांच्या सांस्कृतिक परंपरांचा गौरव करण्यात येणार आहे.

विविध समाजघटक, महिला, जनजातीय बांधव, संत-महंत आणि आध्यात्मिक परंपरांतील मान्यवररांना एकाच व्यासपीठावर आणत सामाजिक समरसता and राष्ट्रीय एकामतेचा संदेश देण्याचा प्रयत्न या सोहळ्यातून केला जाणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. यावेळी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी, सचिव मुकुंद खोचे, उपाध्यक्ष नरसिंहकृपा प्रभू, भक्तिचरणदास महाराज, धनंजय बेळे, चिराग पाटील, शिवाजी बोंदार्डे, राजेंद्र फड, आशिमा केला, अभय नेरकर उपस्थित होते.

गोदापूजनाून जलसंवर्धनाचा संकल्प

गोदावरी ही केवळ नदी नसून कोट्यवधी लोकांच्या श्रद्धा, संस्कृती आणि जीवनाशी जोडलेली जीवनदायिनी आहे. गोदावरी मातेचे पूजन करताना तिचे पावित्र्य जपणे, नदी प्रदूषणमुक्त ठेवणे आणि जलसोंतांचे संवर्धन करण्याचा संकल्प करणे आवश्यक आहे.

याच भावनाेतून गोदापूजन आणि महाआरतीच्या माध्यमातून भाविकांमध्ये पर्यावरणसंवर्धन व जलसंवर्धनाबाबत जनजागृती केली जाणार आहे. शासनाचे नेतृत्व, संतपरंपरा, महिला आणि समाजातील विविध घटक यांच्या सामूहिक सहभागातून गोदावरी सेवेची भावना अधिक दृढ व्हावी, अशी समितीची भूमिका असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT