नाशिक : विकास गामणे
महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. याचाच भाग म्हणून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात महिला सक्षमीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय महिला व बालविकास विभागाने घेतला आहे. या केंद्रांमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात दिला जाणार आहे. केंद्राद्वारे गरजू महिलांपर्यंत सरकारी योजनांची माहिती, मार्गदर्शन, प्रशिक्षण व विविध प्रकारची मदत पोहोचवली जाणार आहे. त्याद्वारे महिलांचे सक्षमीकरण होण्यास मदत होणार आहे.
राज्यातील प्रत्येक महिला सक्षम झाली पाहिजे, या उद्देशाने राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली. त्याशिवाय महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजनाही सुरू केल्या आहेत. मात्र, त्या योजनांपासून अनेक महिला अद्यापही वंचित आहेत. महिला व बालविकास विभागातर्फे महिलांच्या हिताच्या दृष्टीने विविध उपक्रम, योजना राबविल्या जात आहेत. विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या अनेक योजना महिलांपर्यंत पोहोचल्याच नाहीत. योजना चांगल्या असूनही त्या लाभार्थ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचल्या नसल्यामुळे त्या लोकप्रिय झाल्या नाहीत. किंवा त्या योजनांचा लाभ त्यांना मिळालेला नाही. त्यामुळे या महिलांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महिला सक्षमीकरण केंद्र सुरू होत आहे. महिलांना सुरक्षित वातावरण, कायदेशीर संरक्षण, आर्थिक स्वावलंबन आणि कल्याणकारी योजनांचा सहज लाभ देण्यासाठी विभाग सातत्याने प्रयत्न करत आहे. राज्यातील प्रत्येक महिला सशक्त, सक्षम व स्वावलंबी व्हावी हा राज्य सरकारचा उद्देश असून, महिला सक्षमीकरण केंद्र ही या दिशेने उचललेली महत्त्वाची पायरी आहे.
असे असेल सक्षमीकरण केंद्र
प्रत्येक जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात हे केंद्र कार्यान्वित करण्यात येईल. महिलांच्या गरजांचा शोध घेऊन त्यांना योग्य त्या योजनांचा लाभ मिळवून देणे, हे या केंद्रांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. रोजगार, कायदेशीर मार्गदर्शन, प्रशिक्षण व आवश्यक मदत देण्यासाठी आठ प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. हे कर्मचारी त्याप्रमाणे काम करतील.
महिलांसाठी तत्काळ मदत सुविधा
कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला बळी पडलेल्या किंवा संकटात असलेल्या महिलांना तत्काळ मदत मिळणार.
बेरोजगार महिलांसाठी रोजगारविषयक माहिती व संधी उपलब्ध करून दिल्या जातील.
कौशल्यविकास, स्वयंरोजगार, आरोग्य, सुरक्षा अशा विविध विषयांवरील शासकीय योजना समजावून सांगण्याची जबाबदारी केंद्रांकडे असेल.
लाडकी बहीण योजनेसह इतर सर्व योजना जोडल्या जाणार
राज्यातील लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवण्यासाठीही या केंद्रांचा मोठा उपयोग होणार.
या केंद्रांमार्फत होणार हे काम
लाभार्थ्यांचा शोध
पात्रतेची तपासणी
योजनांची माहिती
मार्गदर्शन व फॉलोअप यासंबंधीची सर्व कामे जिल्हास्तरावर समन्वयातून होतील.
प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत असलेल्या महिला व बालविकास अधिकारी कार्यालयांत आता महिला सक्षमीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात येईल. कौटुंबिक हिंसाचार होत असल्यास किंवा नवरा मृत झाल्यास आणि ती बेघर, गरीब असेल, तर त्या महिलेला रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल. विविध प्रकारच्या महिलांची गरज ओळखून त्यांच्यासाठी ही केंद्रे मदतीचा हात पुढे करणार आहेत.नयना गुंडे, आयुक्त, महिला व बालविकास विभाग