Will bring substantial funds for Simhastha: MP Rajabhau Vaje
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी सिंहस्थ-कुंभमेळ्यासाठी केंद्र सरकारकडून भरीव निधी आणणार आहे. तसेच नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी व्यापार, उद्योग, कृषी सेवा या क्षेत्रांच्या अडचणी संसदेत मांडून त्या सोडविणार असल्याचे आश्वासन खासदार राजाभाऊ वाजे यांनी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, निमा, आयमा, मोटर मर्चेंट असोसिएशन, नाशिक धान्य किरकोळ किराणा संघटना, ट्रान्स्पोर्ट असोसिएशन, हार्डवेअर अँड पेंट्स मर्चेंट असोसिएशन, स्पेअर पार्ट मर्चेंट असोसिएशन, सिमेंट मर्चेंट असोसिएशन आदींसह विविध व्यापारी, औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत महाराष्ट्र चेंबरच्या उत्तर महाराष्ट्र शाखा कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.
याप्रसंगी विमानसेवा, ओझर विमानतळ परिसराच्या २० किलोमीटरवर बांधकामास बंदी, नाशिकरोड रेल्वे स्टेशन विकास, रेल्वेसेवा, समृद्धी महामार्ग व राष्ट्रीय महामार्ग दुहेरी टोल, आडगाव येथील लॉजिस्टिक पार्क सुरू करणे, आयटी पार्कमध्ये मोठा आयटी उद्योग आणणे, वंदे भारत रेल्वेची वेळ बदलणे, नाशिक-पुणे रेल्वेसेवा, सिमेंट आणि टायर व स्पेअर पार्टवरील जीएसटी कमी करणे, क्विक कॉमर्सचे वाढते वर्चस्व, किरकोळ किराणा दुकानदारांना प्लास्टिक पॅकिंगसाठी स्वतंत्र परवाना घेणे, फूड लायसन्सचे नियम व लायसन्सची मर्यादा १२ लाखांहून वाढवून २५ ते ३० लाख करणे, प्लास्टिक वापरावर किरकोळ किराणाला होणारा दंड, घरांच्या किमतीची मर्यादा ४५ लाखांहून ७५ लाख करणे, ग्राहकांना घरखरेदीवर एक टक्का जीएसटी आकारणे, एनडीसीसी बँक ऊर्जितावस्थेत आणणे, औद्योगिक वसाहतीतील पायाभूत सोयी-सुविधा यासह विविध प्रश्न संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार वाजे यांच्यासमोर मांडले.
याप्रसंगी महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष संजय सोनवणे, कृषी व ग्रामविकास समितीचे चेअरमन राजाराम सांगळे, पर्यटन समितीचे चेअरमन दत्ता भालेराव, कुंभमेळा समितीचे चेअरमन सचिन शहा, नाइसचे अध्यक्ष रमेश वैश्य, ज्ञानेश्वर गोपाळे, मनीष रावल, गोविंद झा, उमेश कोठावदे, नितीन डोंगरे, कुणाल पाटील, तुषार संकलेचा उपस्थित होते.