Solar Energy Agriculture  Solar Energy Agriculture
नाशिक

Solar Energy Agriculture | 'कागदावर सौर ऊर्जा, पण शेतात वीज कधी?' कांदा उत्पादक संघटनेचा सरकारला सवाल

Solar Energy Agriculture | कृषिपंपांना नियमित विजेसाठी भारत दिघोळे यांचा प्रश्न

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
ग्रामीण महाराष्ट्रात सध्या पिकांसाठी सिंचनाची तातडीची गरज असताना, कृषिपंपांच्या विस्कळीत वीजपुरवठ्यामुळे शेतकरी गंभीर संकटात सापडले आहेत. पावसाची अनिश्चितता आणि वाढत्या तापमानामुळे पिके धोक्यात आली आहेत. शेतात पाणी उपलब्ध असूनही वीज नसल्याने सिंचन करणे अशक्य झाले आहे.

या पार्श्वभूमीवर, कृषिपंपांना नियमित, पुरेशा आणि विश्वासार्ह वीजपुरवठा करण्याची आग्रही मागणी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे.
राज्य सरकारच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत १६,००० मेगावॉट क्षमतेच्या सौर प्रकल्पांद्वारे शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, वितरण प्रणालीतील तांत्रिक अडचणी, उपकेंद्रांची अपुरी क्षमता आणि रोहित्रांवरील अतिरिक्त भार यांमुळे ही योजना अजूनही प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही.

त्यामुळे सौर प्रकल्प उभारण्यासोबतच स्थानिक वीज वितरण पायाभूत सुविधा मजबूत करणे आवश्यक आहे. सौर ऊर्जेचे कागदावरील उद्दिष्ट कितीही मोठे असले, तरी शेतकऱ्याला 'वीज कधी येणार' यातून मुक्ती मिळून शेतातील मोटार वेळेवर सुरू होणे अधिक महत्त्वाचे आहे, असे दिघोळे यांनी म्हटले आहे.
शासनाकडे केलेल्या मागण्या

  • नाशिक जिल्ह्यातील सर्व कृषी फीडरचा तातडीने प्रत्यक्ष आढावा घ्यावा.

  • कृषिपंपांसाठी पूर्वनियोजित आणि स्थिर वीजपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर करून अचानक होणारे बदल थांबवावेत.

  • वारंवार बिघाड होणाऱ्या फीडरची तातडीने दुरुस्ती करावी व ओव्हरलोड रोहित्रांची क्षमता वाढवावी.

  • सौर ऊर्जेची जोड मिळालेल्या फीडरवर प्रत्यक्षात किती तास दिवसा वीज मिळते, याची माहिती सार्वजनिक करावी.

  • शेतकरी प्रतिनिधी आणि महावितरण अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करून समस्या सोडवाव्यात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT