केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बुधवारी नाशिकमध्ये  file photo
नाशिक

नाशिकमध्ये उद्या कोणती व्यूहरचना ठरणार ?अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे 'मिशन महाराष्ट्र'

नाशिकमध्ये उद्या विभागीय कार्यकर्ता संमेलनात ठरणार व्यूहरचना

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : लोकसभा निवडणुकीतील पराभवाची पुनरावृत्ती आगामी विधानसभा निवडणुकीत होऊ नये, यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने लक्ष घातले आहे. राज्यातील भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुतीत विधानसभेच्या जागावाटपावरून सुरू झालेल्या अंतर्गत संघर्षातून दगाफटका होऊ नये यासाठी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 'मिशन महाराष्ट्रा'ची सूत्रे हाती घेतली आहेत. त्याचाच भाग म्हणून बुधवारी (दि. २५) नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रस्तरीय कार्यकर्ता संमेलन आयोजित केले आहे. पक्ष संघटनात्मक बाबींवर मंथन करताना विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक तयारीचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळू शकले नाही. राज्यातील ४८ पैकी जेमतेम १७ जागांवरच महायुतीला समाधान मानावे लागले. त्यातही भाजपला केवळ नऊ जागांवर यश मिळाले. या पराभवाची गंभीर दखल भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतली आहे. महाराष्ट्रात नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत डॅमेज कंट्रोलसह यशाचा आलेख उंचावण्यासाठी थेट अमित शाह मैदानात उतरले आहेत. त्यांच्या उपस्थितीत राज्यभर विभागस्तरावर बैठकांचे सत्र आयोजित करण्यात आले आहे. बुधवारी सातपूर येथील हॉटेल डेमोक्रसी येथे दुपारी १ वाजता शाह यांच्या उपस्थितीत विभागीय कार्यकर्ता संमेलन होणार आहे. या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री तथा महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, महाराष्ट्र निवडणूकप्रमुख रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

भाजपचे निवडणूक रणशिंग

या संमेलनानिमित्त भाजपतर्फे विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. बूथस्तरीय कार्यकर्त्यापासून ते निवडणूक प्रमुखापर्यंतच्या सर्व जबाबदाऱ्यांचे वाटप करताना निवडणूक व्यूहरचनेचा तसेच मतदारसंघनिहाय आढावा घेतला जाणार आहे.

१००० पदाधिकाऱ्यांनाच प्रवेश

उत्तर महाराष्ट्रातील प्रदेश पदाधिकारी, शहर, मंडल पदाधिकारी, मंडल प्रभारी, विधानसभा निवडणूकप्रमुख, विधानसभा संयोजक, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, विविध मोर्चांचे प्रमुख, अशा उत्तर महाराष्ट्रातील निमंत्रित एक हजार पदाधिकाऱ्यांनाच या बैठकीस प्रवेश दिला जाणार आहे. विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर हे संमेलन महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी व्यक्त केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT