बायपास सर्जरी  Pudhari News Network
नाशिक

बायपास सर्जरी म्हणजे काय?

बायपास सर्जरी जीवनरक्षक प्रणालीचे कार्य करते

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : दिलीप सूर्यवंशी

हृदयाच्या रक्तवाहिन्यांना अडथळ्यांच्यापुढे पर्यायी रक्तवाहिन्या जोडून रक्त पुरवण्याची व्यवस्था करणे यालाच बायपास सर्जरी म्हणतात. ही शस्त्रक्रिया गंभीर हृदयविकाराने ग्रस्त व्यक्तींसाठी जीवनरक्षक प्रणालीचे कार्य करते. हृदयाला ऑक्सिजनपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या अरुंद किंवा ब्लॉक होतात. तेव्हा छातीत दुखणे (एनजाइना) किंवा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. जेव्हा एकपेक्षा अधिक रक्तवाहिन्या ब्लॉक होतात, तेव्हा बायपास सर्जरीचा सल्ला दिला जातो.

शस्त्रक्रियेदरम्यान, डॉक्टर शरीराच्या इतर भागातील निरोगी रक्तवाहिन्या किंवा कृत्रिम कलम वापरून हृदयाच्या स्नायूमध्ये रक्त वाहून जाण्यासाठी नवीन मार्ग तयार करतात. याद्वारे अवरोधित किंवा अरुंद धमन्यांना बायपास केले जाते, त्यामुळे रक्त अधिक सहजपणे हृदयाच्या स्नायूपर्यंत पोहोचू शकते.

हार्ट बायपास सर्जरीचे विविध प्रकार

धमन्यांमध्ये किती प्रमाणात अडथळा आहे यावर बायपास शस्त्रक्रिया अवलंबून असते. हृदयाच्या बायपास शस्त्रक्रियांचे विविध प्रकार आहेत.

  1. एकल बायपास शस्त्रक्रिया : जर एक धमनी अवरोधित असेल, तर ती टाळण्यासाठी एक कलमाचा वापर केला जातो.

  2. दुहेरी बायपास शस्त्रक्रिया : जर दोन धमन्या अवरोधित असतील, तर त्यांना बायपास करण्यासाठी दोन कलमांचा वापर केला जातो.

  3. तिहेरी बायपास शस्त्रक्रिया : या प्रक्रियेमध्ये, तीन धमन्या अवरोधित केल्या जातात आणि त्यांना बायपास करण्यासाठी तीन कलमांचा वापर केला जातो.

  4. चौपट बायपास शस्त्रक्रिया : क्वाड्रपल बायपास सर्जरीमध्ये जर चार धमन्या ब्लॉक असतील, तर त्या बायपास करण्यासाठी चार कलमांचा वापर केला जातो.

  5. क्विंटपल बायपास सर्जरी : पाच ब्लॉक केलेल्या किंवा अरुंद कोरोनरी धमन्यांना बायपास करण्यासाठी पाच कलमांचा वापर केला जातो.

बायपास सर्जरी कशी केली जाते?

आराम आणि सुरक्षिततेसाठी रुग्णाला प्रथम सामान्य भूल दिली जाते. त्यानंतर छातीत उभ्या चीरा दिल्या जातात. हृदयात प्रवेश करण्यासाठी स्टर्नम विभाजित केला जातो. छातीच्या भिंतीच्या मध्यभागी 6 ते 8 इंचाचा चीरा देऊन त्यानंतर छातीचे हाड कापले जाते आणि बरगडीच्या पिंज-यातून हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग तयार केला जातो. शस्त्रक्रियेदरम्यान, रक्त पातळ करण्यासाठी आणि ते गोठण्यापासून रोखण्यासाठी औषध दिले जाते. त्यानंतर पाय किंवा छातीतील निरोगी रक्तवाहिनी काढून ती हृदयात जोडली जाते यालाच धमन्या बायपास करणे म्हणतात. ब्लॉक केलेल्या कोरोनरी धमन्यांभोवतीचे रक्त प्रवाहाचे मार्ग बदलले जातात. त्यानंतर हृदयाचे सामान्य कार्य पुन्हा सुरू होते.

बायपास सर्जरी करण्यापूर्वी खबरदारी

धूम्रपान पूर्णपणे बंद करावे, शस्त्रक्रियेअगोदर काहीही खाऊ - पिऊ नये जेणेकरून शस्त्रक्रियेदरम्यान आणि नंतर मळमळ आणि उलट्या टाळता येतात. डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे जसे की, आवश्यक चाचण्या निर्धारित तारखेपर्यंत करणे, विश्रांती घेणे आणि प्रथिनेयुक्त पदार्थ खाणे इत्यादी.

बायपास सर्जरीनंतर खबरदारी

फुफ्फुसाचा संसर्ग टाळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने श्वासोच्छवास आणि खोकल्याचा व्यायाम 4 ते 6 आठवडे करावा. दिवसातून दोन ते तीन वेळा चालावे आणि हळूहळू शारीरिक हालचालींची वेळ आणि तीव्रता वाढवावी. ताण नियंत्रित ठेवावा, कॉलेस्ट्रॉलची पातळी चेक करावी, साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे, लैंगिक संबंध ठेवू नये, हृदयासाठी चांगला, सॅच्युरेटेड फॅट, मीठ आणि साखर कमी आणि फायबर, फळे आणि भाज्या जास्त असलेला आहार घ्यावा. शस्त्रक्रियेनंतर कमीत कमी सहा आठवडे जड वस्तू उचलू नये, गाडी चालवू नये किंवा कठीण कामे करू नये.

होम रिकव्हरी (7 ते 10 दिवस)

बायपास शस्त्रक्रियेनंतर आराम मिळण्यासाठी रुग्णालयात 5 ते 7 दिवस मुक्काम करणे गरजेचे असते. घरी रिकव्हर होण्यास किमान 10 ते 15 दिवस लागतात. यादरम्यान औषधे घेणे, ड्रेसिंग बदलणे, संसर्ग तपासणी, कठीण कामे करणे टाळणे, नियमित औषधांचे सेवन इत्यादी काळजी घ्यावी लागते.

काय खावे?

फळे, भाज्या, दाणे, प्रथिने, फायबर, ओमेगा 3 चे प्रमाण जास्त असलेले निरोगी अन्न खावे, पुरेसे द्रवपदार्थांचे सेवन करावे, एकदम न खाता थोडे थोडे खावे, सप्लिमेंट्स घ्यावेत.

काय खाऊ नये?

जास्त चरबीयुक्त पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ, पूर्ण चरबीयुक्त डेअरी उत्पादने, उच्च सोडियमयुक्त पदार्थ साखरयुक्त पदार्थ, शीतपेये, हायड्रोजनेटेड आणि ट्रान्सफॅट उत्पादने, चहाच्या पानांत किंवा कॉफीच्या बियांत असणारे उत्तेजक द्रव्य जास्त सेवन तसेच अल्कोहोल टाळावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT