नाशिक : कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलची पासिंग आउट परेड नाशिकमध्ये उत्साहात पार पडली. विविध लष्करी विमानचालन कोर्स पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांना या कार्यक्रमात पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी हॅलिकॉप्टरद्वारे करण्यात आलेल्या चितथरारक कसरतींनी उपस्थितांना थक्क केले.
शुक्रवारी (दि. २१) कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये झालेल्या पासिंग आउट परेडमध्ये कॉम्बॅट आर्मी एव्हिएटर्स कोर्स, आर्मी हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टर कोर्स तसेच संयुक्त पायलट आणि ऑब्झर्व्हर कोर्स पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांना पदवी देण्यात आली. अध्यक्षस्थानी सदर्न कमांडचे लेफ्टनंट जनरल धीरज सेठ होते. पदवी मिळवणाऱ्या अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टर व प्रास (ड्रोन) ऑपरेशनसाठी सैद्धांतिक प्रशिक्षण, सिम्युलेशन आणि प्रत्यक्ष उड्डाणाचा कठोर सराव केला होता. परेडमध्ये हेलिकॉप्टर, ड्रोन, हेक्साकॉप्टर, पायदळ आणि चिलखती सैन्य साधनांचा संयुक्त युद्ध प्रदर्शन घडवून आणण्यात आले.
आधुनिक युद्धात एकत्रित कारवाई किती महत्त्वाची आहे हे या प्रदर्शनातून स्पष्ट झाले. लेफ्टनंट जनरल सेठ यांनी अधिकाऱ्यांचे अभिनंदन करत आजच्या युद्धभूमीत ड्रोन, मानवरहित प्रणाली आणि प्रगत तंत्रज्ञान वेगाने महत्त्व वाढवत असल्याचे सांगितले. हेलिकॉप्टर आजही गतिशीलता, बचाव आणि अग्निशक्तीसाठी अतिशय महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. भारतीय सैन्यात सुरू असलेल्या आधुनिकीकरणात सीएएटीएसने मोठी प्रगती साधली आहे. आधुनिक प्रशिक्षण, नवीन तंत्रज्ञान आणि संयुक्त पद्धतीची तयारी या क्षेत्रात संस्थेचे योगदान महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी प्रशिक्षक, अधिकारी आणि संपूर्ण प्रशिक्षण टीमच्या परिश्रमांचे कौतुक करण्यात आले.