नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून शहरामधील विविध जलशुध्दीकरण केंद्र व जलकुंभांना स्काडा प्रणाली बसविण्यासाठी तसेच पावसाळी पूर्व कामांसाठी शडटाऊन घेण्यात आल्याने शनिवारी (दि.१०) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. रात्री उशिरापर्यंत काही कामे सुरूच राहिल्याने रविवारी देखील शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
स्मार्ट सिटी कंपनीमार्फत शहरामधील विविध जलशुध्दीकरण केंद्र व जलकुंभ येथे स्काडा प्रणाली बसविण्याचे काम करण्यात येत आहे. सोबतच बाराबंगला जलशुध्दीकरण केंद्र येथील नव्याने उभारण्यात आलेल्या सबस्टेशनच्या चाचणीचे काम स्मार्ट सिटी कंपनीकडून हाती घेण्यात आल्याने शनिवारी (दि.१०) गंगापूर धरण रॉ वॉटर पंपिंग स्टेशन, चेहेडी पंपिंग स्टेशन, मुकणे धरण पंपिंग स्टेशन बंद ठेवण्यात आले. मान्सुनपूर्व तयारीच्या अनुषंगाने गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथे सबस्टेशनमधील विविध प्रतिबंधात्मक देखभालीची कामे महापालिकेकडून हाती घेण्यात आल्याने गंगापुर धरण व मुकणे धरण येथुन पंपीग करता आली नाही. त्यामुळे महापालिकेची सर्व जलशुध्दीकरण केंद्रे शनिवारी (दि.१०) बंद होती. संपूर्ण शहराचा शनिवारचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत जलकुंभांना फ्लो मीटर बसवणे, लिकेज काढणे, वॉटरप्रुफींग करणे आदी कामे सुरू होती. त्यामुळे रविवारी सकाळी देखील शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम दिसून येणार आहे.
एक्स्लो पॉइंट येथे फ्लो मीटर बसविणे
वृंदावननगर जलकुंभ येथे व्हॉल्व बसविणे
राणेनगर जलकुंभ येथे ४५० एमएमचा व्हॉल्व बसविणे
गोविंदनगर जाँगींग ट्रॅक येथे जलवाहिनीचे लिकेज काढणे
प्रभाग ३० मधील चड्डा पार्क जलकुंभला सप्लाय व्हॉल्व बदलणे
नाशिक पूर्व विभागातील मुख्य ७०० मिमी व्यासाचे दोन व्हॉल्व दुरूस्त करणे
गांधीनगर जलकुंभ येथील ३०० मिमी व्यासाचा व्हॉल्व बदलणे
कठडा जलकुंभ येथे वॉटर प्रूफिंग
पंचवटी जलशुध्दीकरण ९०० मिमी लाईनवर फ्लो मीटर बसविणे