सिन्नर ( नाशिक ): औद्योगिक वसाहतीत पाणी दरात 17.25 टक्के वाढ करण्यात आली असून, या अन्यायकारक दरवाढीचा तीव्र निषेध सिन्नर इंडस्ट्रियल अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (सिमा) केला आहे. ही दरवाढ तत्काळ मागे घ्यावी अशी मागणी केली आहे.
पूर्वी उद्योजकांना 16 रुपये प्रतिक्यूबिक मीटर दराने पाणीपुरवठा होत होता. नव्या वाढीनुसार दर 18.75 रुपये करण्यात आला आहे. त्यामुळे आधीच विविध वाढींचा बोजा सहन करणार्या उद्योजकांवर अधिक ताण पडणार आहे. वर्षभरापूर्वीच फायर चार्जेस, आराखड्याच्या मंजुरीसाठीचे शुल्क तसेच औद्योगिक वीजदरात मोठी वाढ झालेली आहे. त्यात आता पाणी दरवाढ झाल्याने उद्योग संकटात सापडतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
माळेगाव औद्योगिक वसाहतीत मुलभूत सुविधांचा अभाव असून, रस्त्यांची दयनीय अवस्था, गटारांचे अपुरे जाळे, वारंवार खंडित होणारा पाणीपुरवठा, वीज जोडणीत अडथळे अशा अनेक समस्या आहेत. या पार्श्वभूमीवर दरवाढ करणे म्हणजे उद्योजकांना गळचेपी करणे असल्याचे सिमा पदाधिकार्यांनी स्पष्ट केले. या निषेधामध्ये अध्यक्ष किशोर राठी, उपाध्यक्ष किरण भंडारी, सचिव बबन वाजे, कोषाध्यक्ष राहुल नवले, विेशस्त रतन पडवळ, अरुण चव्हाणके, मारुती कुलकर्णी, शांताराम दारुंटे, श्रीरंग हारदे, लक्ष्मण डोळे, नवनाथ नागरे, सतीश नेहे आदींसह असोसिएशनचे पदाधिकारी व उद्योजक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आधीच मूलभूत सुविधा मिळत नाही. त्यात सरकारने केलेली दरवाढ उद्योजकांसाठी अन्यायकारक आहे. ही दरवाढ त्वरित मागे घ्यावी अन्यथा उद्योजकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल.बबन वाजे, सचिव, सिन्नर इंडस्ट्रियल अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सिमा)