

सिन्नर ( नाशिक ) : तालुक्यातील माळेगाव एमआयडीसी परिसरात हिंद रेक्टिफायर कंपनीतील सुरक्षा रक्षकाला चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून मारहाण करून दोरीने बांधत 320 किलो कॉपरची 1.28 लाख रुपये किमतीच्या मुद्देमालाची चोरी केली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेची गंभीर दखल घेत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे इगतपुरी तालुक्यातील घोटी व नाशिक शहरातून सुनील रघुनाथ सोनार (38, रा. राणेनगर, नाशिक) व इस्माईल राकुब खान (45, मूळ रा. सोहरतगड, उत्तर प्रदेश, सध्या रा. घोटी, ता. इगतपुरी) या दोन संशयितांना ताब्यात घेतले. दोन्ही संशयितांची सखोल चौकशी केली असता, त्यांनी त्यांच्या साथीदारांची नावे उघड केली. त्यामध्ये - इरसाद उर्फ लांबू मसुद अली (रा. गोंदेगाव, ता. इगतपुरी), संतोष उर्फ राहुल हिरवे, हर्षद बेंडकोळी, रवि पगारे, वैभव मुकणे,राहुल बोडके (सर्व रा. वाडिवर्हे, ता. इगतपुरी). या टोळीने मिळून गुरुवारी (दि. 11) माळेगाव एमआयडीसी परिसरात सुरक्षारक्षकाला मारहाण करून कंपनीतील गोडाउनमधून कॉपरची चोरी केल्याची कबुली दिली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र मगर, पोलिस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके, पोलिस अंलदार प्रवीण काकड, विनोद टिळे, संदीप कडाळे, सतीश घुटे, आबा पिसाळ, हेंत गिलबिले व प्रदीप बहिरम यांच्या पथकाने केली.
कारवाईदरम्यान आरोपींकडून 197 किलो कॉपर वायर तसेच चोरीसाठी वापरलेले टाटा छोटा हत्ती वाहन असा एकूण 3.78 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. उर्वरित साथीदारांचा शोध पोलिसांकडून कसून घेतला जात आहे. या आरोपींवर यापूर्वीही मालमत्ता व शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे. पुढील चौकशीत आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.