नाशिक : पहेलगाम हल्ल्याच्या घटनेनंतर देशभरात मे महिन्यात हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजवत मॉकड्रिल घेण्यात आले. नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या. नाशिक महापालिकेला मात्र उशिरा जाग आली असून, हवाई हल्ल्याची सूचना देण्यासाठी महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनासह शहरातील १२ ठिकाणी भोंगे बसविण्यात येणार आहेत. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी यासंदर्भात खातेप्रमुखांच्या बैठकीत बांधकाम, विद्युत, शिक्षण, अग्निशमन विभागाला सूचित केले आहे.
जम्मू- काश्मीरमधील पहेलगाम येथे सशस्त्र दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटक मारले गेल्याची घटना दि. २२ एप्रिल २०२५ रोजी घडली होती. या हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर हवाई हल्ले करत जोरदार प्रत्युत्तर दिले. हवाई हल्ल्यांचा इशारा देण्यासाठी देशभरात दि. ७ मे रोजी मॉकड्रिल घेण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाने २५ मे रोजी नाशिक महापालिकेला पत्र देत शहरातील १२ ठिकाणी भोंगे बसविण्याचे सूचित केले होते. या पत्राला दोन महिन्यांहून अधिक कालावधी उलटल्यानंतर महापालिकेला भोंग्यांची आठवण झाली आहे. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी यासंदर्भात खातेप्रमुखांच्या बैठकीत मुद्दा उपस्थित करत तातडीने भोंगे बसविण्याची कार्यवाही करण्याचे संबंधित विभागांना सूचित केले आहे.
महापालिका शाळा क्रमांक ८९, पाथर्डी फाटा, अंबड फायर स्टेशन, अटलबिहारी वाजपेयी शाळा क्रमांक ४३, काठे गल्ली, सातपूर विभागीय कार्यालय, शिवाजीनगर शाळा क्रमांक २०, सातपूर, विश्वासनगर शाळा क्रमांक २४, सातपूर, विभागीय कार्यालय नाशिकरोड, विहितगाव शळा क्रमांक ६४, अमृतधाम फायर स्टेशन, पंचवटी विभागीय कार्यालय, हिरावाडी शाळा क्रमांक ८, पंचवटी, महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवन.
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत हे भोंगे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. प्रत्येक भोंग्याची रेंज ३.२५ किलोमीटर इतकी असणार आहे. भोंगे बसविल्यानंतर त्याची चाचणी घेण्यात येणार असून, लेखी अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केला जाणार आहे.