मुंबई ः मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला पाठिंबा आणि पोलिस दलाची इच्छाशक्ती यांच्या माध्यमातून मुंबईतील विविध धर्मांच्या 1500 प्रार्थनास्थळांवरील भोंगे मुंबई पोलिसांनी उतरवले आहेत. कसलाही गाजावाजा न करता पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबवण्यात आली.
राज्यात काही काळापूर्वी मशिदींवरील भोंग्यांवरून राजकारण पेटले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर सरकारला हे भोंगे उतरवण्यासाठी अल्टिमेटम दिला होता. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, शहरातील विविध धर्मांच्या प्रार्थना स्थळांवरील 1500 वास्तूंवरचे भोंगे उतरवले आहेत. विशेष म्हणजे यामुळे मुंबई शहर भोंगामुक्त झाले आहे.
राज्यासह देशात मंदिर, मशीद, गुरुद्वार, चर्च या धार्मिक स्थळांवरील भोंग्यांवरून सातत्याने वाद होत असताना मुंबई पोलिसांनी अशक्य अशी गोष्ट शक्य करून दाखवली आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या दोन महिन्यांपासून अत्यंत शांततेत पडद्यामागे राहून मुंबई पोलिसांनी ही मोहीम राबवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोज स्वतः याचा आढावा घेत होते. अडथळे निर्माण करणार्यांशी फडणवीस स्वत: बोलत होते.
पोलिस आयुक्त भारती यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी या विषयाला राजकीय रंग येऊ न देता सामोपचाराने विषय मार्गी लागेल यासाठी प्रयत्न केले. तसेच सामाजिक सलोखा कायम राहील याकडेही लक्ष देण्यात आले. मुख्यमंत्र्यांची ही भूमिका सर्व समाजाच्या नेत्यांनी मान्य केली. विरोध न होता सर्व धार्मिक स्थळांवरचे भोंगे काढून टाकण्यास सहकार्य करण्यात आले हे महत्त्वाचे.