नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हे प्रकरण चांगलेच लावून धरले असताना आता भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी देखील या प्रकरणात उडी घेतली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये असल्याचे व्हिडीओ व फोटो सोशल मीडीवर व्हायरल झाले होते. मात्र, पोलिसांच्या तपासात त्यात तथ्य आढळले नाही. त्यानंतर आता पुन्हा तृप्ती देसाईंनी केलेल्या आरोपांमुळे वाल्मिक कराडच्या नाशिक कनेक्शनवरुन चर्चा सुरु झाली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित वाल्मिक कराड व विष्णू चाटे हे दोघेही १५ आणि १६ डिसेंबर २०२४ ला दिंडोरी येथील आश्रमात मुक्कामी होते, असा खळबळजनक आरोप भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केला आहे. सीआयडीच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज का बघितले नाही, या आश्रमाचे महाराज आणि गृहमंत्री यांचे संबंध आहेत म्हणून कारवाई झाली नाही का, असे एक ना अनेक प्रश्न तृप्ती देसाई यांनी उपस्थित केले आहेत.
यावर दिंडोरी येथील स्वामी समर्थ केंद्राच्या प्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी तृप्ती देसाई यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. सीआयडीचे अधिकारी आमच्या केंद्रात तपासासाठी आले होते. त्यांनी आमचे सीसीटीव्ही तपासले. त्यानुसार वाल्मिक कराड हे 16 डिसेंबरला केंद्रात येऊन गेले, मात्र त्यांच्यासोबत विष्णू चाटे नव्हते अशी माहिती आम्हाला देण्यात आली. दत्तजयंतीचा सप्ताह आमच्याकडे होता तेव्हा ते आले होते. त्यावेळी असंख्य भाविक आमच्याकडे आले होते. त्यामध्ये कोण आले हे आम्हाला माहिती नाही, असंख्य भाविक येत असतात त्याची काही आम्ही नोंद ठेवत नाही. मात्र, वाल्मिक कराड एकटे आले व निघून गेल्याचे त्यांनी सांगितले.
देसाई यांच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. वाल्मिक कराड आणि आमचा संबंध नाही. कराड केवळ दर्शनासाठी आले होते. तसेच आम्ही वाल्मीक कराडला कोणतीही व्हीआयपी ट्रीटमेंट दिलेली नाही किंवा आश्रय दिला नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. तृप्ती देसाई यांच्या आरोपात एक टक्के देखील सत्य नाही. इथे मंदिरात लाखो भाविक येतात, इथ चुकीच्या प्रवृत्तींना संरक्षण दिलं जात नाही, असंही स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.